दैनिक स्थैर्य । दि. १२ जून २०२२ । पंचकुला । महाराष्ट्राने कालपासून हरियानावर पदकतालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र, ही आघाडी केवळ एकाच सुवर्णाची आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उद्या (सोमवारी) शेवटच्या दिवशी हातघाईची लढाई होणार आहे. महाराष्ट्राचे खो-खोचे दोन्ही संघ फायनलमध्ये गेल्याने ती सुवर्णपदके हक्काची समजली जात आहेत. टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्राने चांगलेच आव्हान उभे केले आहे. तर हरियानाचे शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या बॉक्सिंगमध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार बॉक्सर गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.
आज (रविवारी) चार सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्य पदके मिळाली. आर्चरीमध्ये १ सुवर्णपदक आले. त्यांनी रौप्य पदकही मिळवून दिले. टेबल टेनिसमध्ये दीया चितळे पुन्हा सुवर्ण घेऊन आली. जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे सुवर्णसंख्या वाढली. तिने आज दोनदा सुवर्ण कामगिरी केली. बॉक्सिंगमध्ये मात्र तब्बल पाच कांस्य पदके आली. सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राची पदकसंख्या शंभरीपार नेली.
आज सकाळी आर्चरीमध्ये कम्पाउंडमध्ये सातारच्या आदिती स्वामीने सुवर्णपदक मिळवून दिले. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्य पदक मिळाले.
अपेक्षाची सुवर्णभरारी सुरूच
जलतरणात अपेक्षा फर्नांडीसमुळे महाराष्ट्राची खरोखरच नंबर वनची अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता बळावली आहे. तिने आजही पदकांचा सिलसिला सुरूच ठेवला. आज दोन सुवर्णपदके मिळवून दिली. ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण घेतल्यानंतर २०० मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्ण पदक उंचावले. त्यात २.१८.३९ सेकंदाची वेळ नोंदवून इंडियातील बेस्ट टायमिंग दिला. ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये सायंकाळी उशिरा एक रौप्य पदक आले. मुलांच्या या रिले संघात अर्जुनवीर गुप्ता, रिषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश आहे.
गोल्डन पंचसाठीची लढाई
बॉक्सिंगमध्ये व्हिक्टर सिंग (पुणे) हा चंदीगडच्या अंकितसोबत सुवर्णपदकासाठी लढेल. सुरेश विश्वनाथची फाईट हरियानाच्या आशिषसोबत आहे. विजय सिंग उत्तर प्रदेशच्या आकाश कुंदीरसोबत तर कुणाल घोरपडे याचा हरियानाच्याच दीपकसोबत सामना होईल. महाराष्ट्राचे अंतिम सामन्यात उतरणारे सर्व बॉक्सर हे पुण्याचे आहेत.
टे.टे.मध्येही सुवर्णदीया
टेबल टेनिसमध्ये मुलींमध्ये एकेरीत मुंबईच्या दीया चितळेने आज पुन्हा महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिल्लीच्या लतिका नारंग हिचा पराभव केला. उद्या (सोमवारी) दिल्लीच्याच आदर्श क्षेत्रीसोबत महाराष्ट्राच्या दीपित पाटीलचा कांस्य पदकासाठी सामना होणार आहे.
पदक तालिका
महाराष्ट्र ४० – ३५ – २९ ः १०४
हरियाना ३९- ३४ – ४२ ः ११५
कर्नाटक २१ – १४ – २२ ः ५७
(ही आकडेवारी सायंकाळी ६.१० वाजताची आहे.)