दैनिक स्थैर्य | दि. १३ डिसेंबर २०२४ | फलटण |
कोळकी येथे ‘सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री’ म्हणून माझ्या नावाचे लागलेले बॅनर ही फलटणमधील माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेचा मी आदर करतो. फलटणच्या जनतेचे माझ्यावर व माजी खासदार रणजितसिंह यांच्यावर असलेले प्रेम यामधून व्यक्त होते. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाच्या विकासावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जसा विश्वास दाखविला आहे तसाच विश्वास माण-खटावच्या जनतेने माझ्यावर व फलटणच्या जनतेने सचिन पाटील यांच्यावर दाखवून आम्हाला मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत पाठविले आहे, असे प्रतिपादन माण-खटावचे चौथ्यांदा निवडून आणलेले आमदार जयकुमार गोरे यांनी केले आहे.
फलटण येथे पत्रकारांनी फलटण, माण-खटावच्या निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नांना आ. गोरे यांनी उत्तरे दिली.
आ. गोरे पुढे म्हणाले की, गेल्या १५ वर्षामध्ये माण-खटावमध्ये मी प्रचंड विकासाची कामे केली आहेत. त्या कामांवर व माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर जनतेने मोठा विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच मी ५० हजारांचा मताधिक्य घेऊन आज चौथ्यांदा तेथे निवडून आलो आहे. मात्र, फलटणच्या श्रीमंत नेतृत्वाने मला संपविण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला आहे. त्यात ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत. म्हणूनच आज ते सुडाचे, द्वेषाचे राजकारण करत आहेत. त्यातूनच त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव घडवून आणला आहे. परंतु फलटणच्या जनतेचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी फलटणमध्ये विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणले आहे आणि सचिन पाटील यांना आमदार केले आहे.
आमदार सचिन पाटील हे माजी खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली फलटणच्या विकासाचा गेल्या २० ते २५ वर्षांचा राहिलेला बॅकलॉग भरून काढतील, असा मला विश्वास आहे. माजी खासदार रणजितसिंह यांचे नाईकबोमवाडी येथील एमआयडीसीचे स्वप्न आमदार सचिन पाटील नक्कीच सत्यात उतरवतील, असा मला विश्वास आहे.
माजी खासदार रणजितसिंह यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. गोरे म्हणाले की, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार असताना माढा लोकसभा मतदारसंघात प्रचंड विकासाची कामे आणली आहेत. त्यांना पुन्हा माढ्याचा खासदार करण्याचे माझे स्वप्न आहे, त्याद़ृष्टीनेच माझी वाटचाल सुरू आहे.