दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । बंधन बँक लि . शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेले बँक कर्मचाऱ्यानेच दरोड्याचा बनाव करुन बँकेच्या पैशावर डल्ला मारला पण पोलीसानी तपास करून त्याचे बिंग फोडले व गजाआड केले.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बंधन बँक लि . शाखा फलटण या बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून नोकरीस असलेले समाधान भिमराव वजाळे (वय २३ वर्ष , सध्या रा . स्वामी विवेकानंदनगर , बी . एस . एन . एल . ऑफिसच्यासमोर बंधन बैंक रेसिडन्स , फलटण मुळ रा . माळीनगर , अकलुज , ता . माळशिरस , जि . सोलापूर) यांने दि. २२ फेब्रुवारी 2022 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली होती. या तक्रारीत, दि . २२ फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास तो बंधन बँकेच्या कलेक्शनचे ७३ हजार ४६५ रुपये घेऊन अलगुडेवाडीहुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना दोन मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघाजणांनी त्यांचा पाठलाग करुन खटकेवस्तीजवळील चव्हाणपाटी येथे गाठुन त्यांच्या डोळ्यात चटणीची पुड टाकुन त्यांचेकडील ७३ हजार ४६५ रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली आहे .
समाधान भिमराव वजाळे यांच्या तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार समाधान भिमराव वजाळे याच्याकडे तपास करताना पोलीसांना संशय आल्याने अधिक विचारपूस केली असता वजाळे याने गुन्ह्याची कबुली दिली व सांगितले की, दि. २२ फेब्रुवारी 2022 रोजी सकाळपासून दुपारपर्यंत बंधन बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या हप्त्यांची रोख रक्कम ७३ हजार ४६५ रुपये हडप करण्याच्या दृष्टीने त्याचा गावाकडील मित्र महंम्मद हमीद नदीफ मोमीन (वय २२ वर्ष, रा. कांतीगल्ली, अकलुज, ता . माळशिरस, जि. सोलापूर) यास फलटणमध्ये बोलावुन घेतले होते. त्यानंतर दोघांनी दरोड्याचा बनाव करण्याचा प्लॅन केला . त्यामध्ये ठरल्यानुसार महंम्मद हमीद नदीफ मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंतर त्याने जवळच्याच एका गावातील किराणा दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वतःचे डोळ्यावर टाकल्याचा बनाव करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिली.
या गुन्ह्यातील समाधान भिमराव वजाळे यांचेसह त्यांचा साथीदार असलेल्या महंम्मद हमीद नदीफ मोमीन यास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन गुन्हा करताना त्यांनी वापरलेले दोन मोबाईल हॅण्डसेट व व एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा . अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दादासो यादव , मोहन काळे , शोभाताई खाडे , उर्मिला पेंदाम , पो.ना वैभव सूर्यवंशी , अमोल जगदाळे , रुपाली भिसे व गणेश अवघडे यांनी केली.