पैशांसाठी खासगी सावकाराने बाळालाच पळवून नेले; सातार्‍यातील प्रकार : पोलिसांकडे तक्रार करुन अद्याप न्याय नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२२ जानेवारी २०२२ । सातारा । खासगी सावकारीच्या व्यवहारातून खासगी सावकार असलेल्या दांम्पत्याने चक्क दीड महिन्याची मुलगीच घेवून जात बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली आहे. मुलगी नेण्यास गेले असता परत आला तर पाय काढून टाकीन, जीवे मारीन अशी धमकी ही खासगी सावकार दांम्पत्याकडून दिली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करुन देखील त्या छोट्या बाळ असलेल्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.

मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी राहणार्‍या कुचेकर कुटुंबियासमवेत हा प्रकार घडलेला आहे. अभिषेक कुचेकर या युवकाने काही आर्थिक अडचणीमुळे सदरबझार येथील संजय बाबर व अश्‍विनी पवार-बाबर या खासगी सावकारी करणार्‍या दांम्पत्याकडून गतवर्षी 30 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर एक वर्षभरात अभिषेक कुचेकर याने बाबर दांम्पत्याला 60 हजार रुपये परत केलेले आहेत. एका वर्षात दुपटी, चौपटीने व्याज वसूल करुन देखील बाबर दांम्पत्याची भूक थांबली नाही.

बाबर दांम्पत्य सातत्याने 30 हजारांपोटी आणखीन पैशांची मागणी कुचेकर यांच्याकडे करतच होते. शेवटी शेवटी तर गत चार ते पाच महिन्यापूर्वी अभिषेक कुचेकर यांची दीड महिन्याची मुलगीच या बाबर दांम्पत्याने घरात येवून उचलून नेली आहे. अभिषेक याची पत्नी नुकतेच जन्मलेल्या तिच्या दीड महिन्याच्या मुलीला असे कोणीतरी उचलून नेल्याने मुलीसाठी तिचे आईचे काळीज तडफडत आहे. त्यामुळे कुचेकर कुटुंबियांनी गत चार ते पाच महिन्यात बाबर दांम्पत्याकडे जावून मुलीला परत करण्याची मागणी केली तरी दगडाचे काळीज असलेल्या बाबर दांम्पत्याने छोट्या मुलीला त्यांच्याच ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवले आहे.

अभिषेक त्याच्या मुलीला परत आणण्यासाठी संजय बाबर यांच्याकडे गेल्यावर त्याला व त्याची पत्नी पायलसह कुचेकर कुटुंबियांना बाबर दांम्पत्याकडून थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच ही मुलगी त्यांना विकली असल्याचे सांगून अजून चार ते पाच लाख रुपये द्या व मुलगी घेवून जावा, अशी दमदाटीही बाबर दांम्पत्याकडून कुचेकर कुटुंबियांना केली जात आहे.

चार ते पाच महिन्यापासून एक माता तिची नुकतीच जन्म झालेल्या दीड महिन्याच्या मुलीपासून वेगळी करुन माणुसकी किती खालच्या स्तराला गेलेली याचे धक्कादायक उदाहरण सातार्‍यातील बाबर दांम्पत्याने जगासमोर आणले आहे. कर्जाची मूळ घेतलेली रक्कम भागवून आणखी त्यावर दुप्पट रक्कम एका वर्षात देवून छोट्या मुलीला आणखी पैशांची मागणी करत गहाण ठेवून घेणार्‍या या कलियुगातील प्रकाराला आता नेमके काय म्हणायचे असा प्रश्‍न सातारकरांना ही घटना वाचून निश्‍चितपणे पडल्याशिवाय राहणार नाही.

पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई

केवळ दीड महिन्याचे लेकरु पायल कुचेकर यांच्यापासून तोडण्यात आल्याने ही माता दररोज धाय मोकलून मुलीच्या आठवणीत अश्रु ढाळत आहे. वारंवार तिचा पती अभिषेक याला ती मुलीला घेवून या म्हणून विनवत आहे. मुलीला आणण्यास गेल्यास बाबर दांम्पत्य जीवे मारण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी करत आहे. हा सर्व प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असून अशा प्रवृत्तीविरुध्द तक्रार करुन देखील सातारा पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचे कुचेकर कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

सदरबझारमधील खासगी सावकारावर कारवाई करा
सदरबझारमधील संजय बाबर या खासगी सावकाराचा हा अजब कारनामा ऐकून निश्‍चितपणे ही संताप आणणारी व माणुसकीला काळिमा फासणारीच आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार करुन देखील न्याय न मिळाल्याने कुचेकर कुटुंबियांनी थेट अपर पोलीस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांचाकडे दि. 20 रोजी कैफियत मांडली. त्यांना लेखी निवेदन दिल्यावर त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले आहे.

शहर पोलिसांकडून कारवाईच नाही
वास्तविक चार महिन्याची छोटी मुलगी खासगी सावकाराने पळवून नेली असल्याचा हा प्रकार गंभीर असताना पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास करुन धडक कारवाई करण्याची आवश्यकता होती. मात्र, पोलिसांकडून जावून देखील कुचेकर कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. उलट अश्‍विनी बाबर हिने तर चक्क पोलीस ठाण्यासमोरच कुचेकर कुटुंबियांना धमकी दिली आहे. हा प्रकार म्हणजे पोलीस दलाचा वचक अपप्रवृत्तींवर आहे की नाही असा प्रश्‍न निर्माण करणाराच आहे.

गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालावे
खासगी सावकारीला सातार्‍यात एसपी संदीप पाटील यांच्या काळात चांगलाच लगाम बसला. अनेक खासगी सावकार आजमितीस गजाआड आहेत. मात्र, त्याच सातार्‍यात एक खासगी सावकार पैशांसाठी दीड महिन्याचे बाळ उचलून नेतो आणि ते परत देण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करतो. पोलिसात या गंभीर प्रकाराची तक्रार दाखल होवून देखील पोलीस न्याय देवू शकत नसतील आता गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी यात लक्ष घेवून एका मातेला न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी कुचेकर कुटुंबियांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!