‘पुरस्कार’ अभिमान आणि शान वाढविणारा असतो – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । मुंबई । राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले जाते. या कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना पाठबळ आणि ऊर्जा मिळावी, यासाठी दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात. पुरस्कार हा अभिमान आणि शान वाढविणारा असतो, असे प्रतिपादन  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

मुंबईत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथे उच्च व तंत्रशिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 2016-17 ते सन 2020-21 या काळातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईच्या कुलगुरु डॉ.उज्ज्वला चक्रदेव, महाराष्ट्र पशु व मत्स्यविद्यापीठ, नागपूर डॉ.ए.एम.पातुरकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभू, अमित गुप्ता, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे कार्य राज्यातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी कोविड काळात कोविड योद्धा म्हणून कार्य केले आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे यासाठी मागील पाच वर्षातील सर्व पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्य केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेमधून विद्यार्थ्यांना मिळणारे मानधन कमी असल्याने यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आणि यामध्ये जवळपास 65 टक्के वाढ करण्यात आली. तसेच राज्यांच्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सात कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला, अशी माहिती श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य देशातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जाते. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे याचा राज्याला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे येथे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे सांगून कोविडच्या संकटानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन असा संभ्रम निर्माण झाला आहे. या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी एनएसएस विद्यार्थ्यांनी एक चळवळ म्हणून काम करावे, असे आवाहनही श्री.सामंत यांनी केले. दरम्यान ‘कोविड योद्धा’ म्हणून कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचे ‘कोविड युवा योद्धा’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मागील पाच वर्षातील राज्यातील पुरस्काराचे वितरण करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!