दैनिक स्थैर्य | दि. १० डिसेंबर २०२४ | फलटण |
बांगलादेशमधील हिंदू जनतेवर होणारे अत्याचार त्वरित थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कारवाई करण्याची मागणी हिंदुराष्ट्र समन्वय समिती व सकल हिंदू समाज कृती समिती फलटण तालुका यांच्या वतीने फलटणचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेश येथे काही महिन्यांपासून हिंदू धर्मातील व्यक्तींवर इस्लामिक कट्टरपंथी लोकांकडून सतत अत्याचार केला जात आहे. हे अत्याचार त्वरित थांबवण्यासाठी कारवाई करण्यात यावी.
बांगलादेशामध्ये हिंदू धर्मातील लोकांना इस्लामिक कट्टरपंथी लोकांकडून हिंदू लोकांच्या हत्या करणे, हिंदू महिलांच्या व मुलींच्या वर बलात्कार करणे, हिंदूंची घरे व दुकाने पेटवून देणे, हिंदूंच्या संपत्तीचे व मालमत्तेची लूट करणे, त्यांच्या जमिनी व घरे जबरदस्तीने बळकावणे तसेच हिंदूच्या मंदिरांची तोडफोड करणे व मूर्तीची विटंबना करणे, मंदिरे पेटवणे, श्रीकृष्ण मंदिर, इस्कॉन या मंदिरांची तोडफोड करणे व पेटवून देणे, जाळपोळ करणे तसेच इस्कॉनचे संत चिन्मय कृष्णदास यांना बंगलादेशमध्ये अटक करून ठेवले आहे. तसेच तुरुंगामध्ये त्यांच्यावर अतोनात अत्याचार होत असून त्यांचा छळ केला जात आहे. तसेच त्यांना न्यायालयीन जामीन अथवा कायदेशीर न्याय मागण्यात अडचणी येत असून त्यांच्या वकिलांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना न्याय मिळावा व त्यांची तुरुंगातून सुटका त्वरित व्हावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच जागतिक मानव अधिकार कायद्याअंतर्गत सर्व देशांनी मिळून बांगलादेशातील सरकारवर दबाव टाकून हिंदूंवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा. बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणारा अत्याचार जर थांबला नाही तर जगातील सर्व हिंदू धर्मातील लोक रस्त्यावर उतरतील व जाहीरपणे तीव्र आंदोलन करतील. हिंदू धर्मातील लोकांवर होणार्या अत्याचाराचा आम्ही सर्वजण निषेध करत असून हिंदूंवर होणारा अत्याचार त्वरित थांबवावा, अशी मागणी निवेदनात सकल हिंदू समाज कृती समिती फलटण तालुका यांनी केली आहे.
हे निवेदन हिंदूराष्ट्र समन्वय समितीचे प्रशांत निंबाळकर, अॅड. संजय कांबळे-पाटील, अॅड. प्रशांत भोसले, मंगेश खंदारे यांनी दिले आहे.