उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचा शुक्रवारी (दि. 2) रोजी वार्षिक रथोत्सव


सातारा – येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर. (छाया -अतुल देशपांडे ,सातारा)

स्थैर्य, सातारा, दि. 8 डिसेंबर : श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व विद्यमान पीठाधीपती श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा सोमवार,29 डिसेंबर 2025 ते शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे.

यानिमित्त सोमवार (दि. 29 ) डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मंदिरात ध्वजारोहण व प्रधान संकल्प संपन्न होणार आहे. त्यानंतर मंगळवारी दि. 30 रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत पुण्याहवाचन, गणपती होम , नवग्रह होम, तसेच सायंकाळी राधाकृष्ण यांचा विवाह सोहळा होणार आहे. बुधवार दि.31 रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत घटस्थापना मंदिरातील सर्व देवतांचे मूलमंत्र ,जप, होम ,पूर्णाहूती व आरती होणार आहे. दरम्यान गुरुवार,दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 6 ते 12 या वेळेत होम हवन, आरती, प्रसाद होऊन दुपारी 3 ते 6 या वेळेत मंदिरातील श्री महागणपतीचा रथोत्सव आणि दीपोत्सव सोहळा होणार आहे.

शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी कोल्हापुर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन् व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन् , सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ. एस. एस. मांजरेकर, तसेच मुरली श्रीनिवासन व सौ. सुधा मुरली यांच्या हस्ते या रथाचे पूजन होणार आहे.

या उत्सवातील मुख्य रथोत्सवाचा कार्यक्रम होऊन पहाटे पाच वाजता गणपती होम व मूर्तीचे यात्रा दान होऊन शुक्रवार दि.2 जानेवारी 26 रोजीसकाळी आठ ते नऊ या वेळेत रथ पूजन आणि रथ प्रस्थान होणार आहे .संपूर्ण सातारा शहरातून हा रथ नटराज मंदिरातून बाहेर पडल्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून जिल्हा परिषद अध्यक्ष निवासस्थानावरून साई मंदिर, गोडोली तेथून पोवई नाका, नगरपालिका चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकातून राजवाडा येथे येऊन त्यानंतर मोती चौकातून सदाशिव पेठ मार्गे, 501 पाटी ,शनिवार पेठ मार्गे पोलीस मुख्यालयावरून ,पोवई नाका येथे येऊन त्यानंतर कुबेर गणपती मंदिर मार्गावरून डीएसपी बंगला तसेच पुन्हा नटराज मंदिरात सायंकाळी सहा वाजता परत येणार आहे .

सायंकाळी रथ आगमन झाल्यावर भक्तांच्या उपस्थितीत महामंगल आरती व प्रसाद वितरण होणार असून शनिवार, दि. 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा या वेळेत श्री नटराज देवाला महाअभिषेक, लघुरुद्र व शिवकाम सुंदरी व नटराज यांचा कल्याणउत्सव अर्थात लग्नसोहळा संपन्न होऊन त्यानंतर आरती व महाप्रसाद वितरण होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!