पत्रकारांच्या मागण्यांवर उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापण्याची घोषणा अभिनंदनीय : रवींद्र बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२३ । फलटण । राज्यातील पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे  शासनाच्यावतीने मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत जाहीर केले होते. त्यांनी केलेली ही घोषणा अभिनंदनीय असल्याचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये सांगितले.

बेडकिहाळ यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतची मागणी केली होती. यावेळी अन्य सदस्यांनीही पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्‍नांवर उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे यांनी अभ्यासगटाचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापूर्वी घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत; हे अभिनंदनीय आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश

आपल्या उत्तरात मंत्री देसाई यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतून लाभार्थी पत्रकारांना दरमहा 20 हजार रुपये देण्याचा शासननिर्णय दोन दिवसात काढण्यात येईल असे जाहीर केल्यामुळे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या अनेक दिवसांच्या आणखी एका पाठपुराव्याला यश मिळणार असल्याचे बेडकिहाळ यांनी स्पष्ट करताना राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीनंतर शासनाच्यावतीने मानधन मिळावे अशी मागणी सातत्याने महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी सं यांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून आम्ही करीत होतो. महाराष्ट्र राज्य प्रसार माध्यमे व वृत्तपत्रे शासकीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदाच्या माध्यमांतूनही समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्यामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मंजूर झालेल्या या पत्रकार सन्मान योजनेला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचेच नाव देण्याची महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली व राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा रु.11 हजार मानधन 2 फेब्रुवारी 2019 पासून सुरु झाले अशीही माहिती या प्रसिद्धीपत्रकात नमूद केली आहे.

ज्येष्ठ पत्रकारांच्या या मानधनात वाढ व्हावी अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी बरोबरच मुंबईतील पत्रकार संघटनांनीही सातत्याने शासनाकडे केली होती. सर्वांच्या मागणीला आता यश आले आहे तरी एव्हढ्याने ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्‍न संपत नाहीत. या सर्व ज्येष्ठ पत्रकारांचे वय व वृद्धापकाळातले आजार लक्षात घेवून या सर्वांना राज्यातील सर्व शासनमान्य धर्मादाय रुग्णालयातून कॅशलेस सर्व चाचण्या, तपासण्या, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार तातडीने मिळण्याची व्यवस्था राज्याच्या आरोग्यविभागाने करणे, ज्येष्ठ पत्रकार मयत झाल्यानंतरसुद्धा हे सन्मानधन माघारी हयात असणार्‍या पती/पत्नींना ते हयात असेपर्यंत मिळण्याची व्यवस्था, तसेच सन्मानधन घेणार्‍या ज्येष्ठ पत्रकार पती/पत्नींना त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रातून दरमहाची औषधे मोफत मिळण्याची व्यवस्था याबाबतही सर्वांनी पाठपुरावा करावा असे आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.

शहरी व नागरी पत्रकारांच्या अन्य समस्या, विशेषत: ग्रामीण भागातील लघुवृत्तपत्रे यांचे प्रश्‍न, तालुका व जिल्हास्तरावर काम करणार्‍यांना पत्रकारांना ‘म्हाडा’ तर्फे सवलतीत गृहनिर्माण संस्था करुन घरे मिळणे, तसेच तालुका व जिल्हा पातळीवर प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक वृत्तपत्रांना मोठ्या प्रमाणावर शासनाच्या व शासकीय महामंडळांमार्फत जाहिरात रुपाने अर्थसहाय्य, संगणक सुविधेसाठी विशेष अनुदान, माहिती व जनसंपर्क विभागाच्या सर्वच समित्यांवर प्रत्यक्ष काम करणार्‍या व धर्मादाय आयुक्तांनी शिफारस केलेल्या ज्येष्ठ संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करणे, शासकीय अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत मिळणे, मोफत आरोग्य तपासणी, चाचणी व उपचार यांसाठी स्वतंत्र विशेष ग्रीन कार्ड देणे असे अनेक प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहेत. तसेच मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारणे हाही मराठी पत्रकारांच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. राज्यशासनाने प्रस्तावित केलेल्या अभ्यास गटामार्फत अशा सर्व प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असून राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनीसुद्धा यासाठी आग्रही राहावे असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी या प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
विधान परिषदेत पत्रकारांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे, मंत्री शंभूराज देसाई, विधान परिषद सदस्य धिरज लिंगाडे, सचिन अहीर, अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, जयंत पाटील, राजेश राठोड, सुनील शिंदे, निलय नाईक, डॉ.मनीषा कायंदे यांना या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने विशेष धन्यवाद देण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!