स्थैर्य, म्हसवड, दि. २७ : माण व खटाव या दोन तालुक्यात उन्हाळ्यात कायमच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असते यासाठी या तालुक्यात शासनाला पाण्याचे टँकर चारा छावण्या आदी सुरु कराव्या लागत असुन त्यासाठी शासनाला कोट्यावधी रुपयांचा खर्च येत आहे, शासनाचा हा खर्च कायमस्वरुपी वाचण्यासाठी शासनाने उरमोडी, कृष्णा, व वेण्णा या नद्यांचे पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी उचलुन द्यावे यासाठी येणारे विजबील शासनाने भरल्यास ते नक्कीच चारा छावणी व पाणी टँकरच्या बीलापेक्षा कमी राहणार असल्याने याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी माजी अभियंता सुनिल पोरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पोरे यांनी म्हटले आहे की दरवर्षी पावसाळ्यात वरील तीन ही नद्यांचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन जाते त्या पाण्याचा कोणाला फारसा उपयोग होत नाही त्या पाण्याचे जर शासनाने नियोजन केले तर ते पाणी माण – खटावच्या भुमित येवु शकते त्यासाठी शासनाने सदर नद्यांचे वाहुन जाणारे पाणी उचलुन माण – खटावच्या नदीपात्रात सोडावे यासाठी जे काही विद्युत बील येणार आहे ते निश्चित च टंचाई निवारणारण्या पेक्षा कमी राहणार आहे. यामुळे माण खटावच्या भुमित कायम पाणी राहणार असुन हे दोन्ही तालुके कायम सुजलाम् सुफलाम होणार आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस असुन पहिल्या पावसातच जिल्ह्यातील काही नद्या मोठ्या प्रमाणावर वाहु लागल्या आहेत मात्र माण तालुक्याची जिवनसंगिणी असलेली माण गंगा नदी ही कायमच कोरडी ठणठणीत असते सध्याही ही अशीच कोरडी ठणठणीत असल्याचे दृष्य आहे.
यापुर्वीही उरमोडीचे वाहुन जाणारे पाणी माण – खटावला मिळावे यासाठी स्वत: पोरे यांनी काही मित्रांच्या सोबत म्हसवड येथे आमरण उपोषणही केले होते त्याला प्रशासनाने गंभीरता दाखवल्याने सदरचे वाहुन जाणारे पाणी माण- खटावच्या भुमित येण्यास मोठी मदत झाली होती त्यामुळे सदरचे पाणी माण – खटावला पुन्हा नेहमीच येण्यासाठी परत कोणाला आंदोलन करावे लागणार नाही व शासनाचा चारा छावणी व पाण्याच्या टँकरसाठी होणारा खर्च हा निश्चीतच टळणार असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन उपेक्षित माण – खटावला पाणीदार करावे अशी मागणी पोरे यांनी केली आहे.