
स्थैर्य, वाई, दि.२३: पाचगणीच्या बाजारपेठेत रुग्णवाहिकेने चार वाहनांना पहाटेच्या सुमारास ठोकरले. चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास एका रुग्णवाहिकेने चार चाकी वाहनांना धडक दिली. चालकाला पहाटेच्या सुमारास डुलका आल्याने चालकाचे रुगवाहिकेवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्या गाड्यांना धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
खेड येथील एक रुग्णवाहिका रत्नागिरीहून एका कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेवून सोलापूर जिल्ह्यात गेली होती. संबंधित मृतदेह पोचवून पुन्हा रुग्णवाहिका वाई पसरणी घाट चढून पहाटे साडेपाच वाजता पाचगणीत आली. येथील शिवाजी चौकात रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्या वाहनांना रुग्णवाहिकेने धडक दिली.ही धडक जोरदार होती की त्यामुळे सर्व वाहने मागच्या बाजूने एकमेकांवर आदळल्याने वाहनांची मागील बाजू चक्काचूर झाली. ही वाहने अल्फाज घडीया, सुनील उंबरकर, येवले आणि बोरा यांच्या मॉलकीची आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. अधिक तपास पाचगणी पोलीस करत आहेत.