स्थैर्य, फलटण : फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील लाईफ लाईन या हॉस्पिटलच्या आवारात लावलेली ॲम्ब्यूलन्स अज्ञाताने फोडल्याचा प्रकार घडला आहे. सदर प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून घडला असल्याची चर्चा घटनास्थळी आहे. दरम्यान ॲम्ब्यूलन्स सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. सदर प्रकार व्यावसायीक स्पर्धेतून व वैयक्तिक भांडणातून झाला असावा. या घटनेत हॉस्पिटलचा व येथील व्यवस्थापनाचा कोणताही काडीमात्र संबंध नाही असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
फलटण शहरात महात्मा जोतीबा फुले चौकालगत असलेल्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सातत्यपुर्वक मोठी वर्दळ असते. यामध्ये विविध प्रकारचे रुग्ण व त्यांच्या सोबत असणारे व त्यांना भेटावयास येणार्यांचा समावेश असतो. दुपारी चारच्या सुमारास एका आज्ञात इसमाने दुचाकीवरुन येत ॲम्ब्यूलन्सच्या सर्व काचा फोडल्या व या नंतर तो दुचाकीवरुन तेथून निघून गेल्याची चर्चा घटनास्थळावर आहे. या घटनेबाबत अमोल दशरथ रोमण रा. स्वामी विवेकानंद नगर, फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात फिर्याद दाखल केली असून गाडीचे पंचवीस हजारांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.