दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । सातारा । सातारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवीन कास धरणाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल. त्यानंतर सातारकरांना मुबलक पाणी मिळेल,’ असा विश्वास नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केला.
सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्या कास तलावाची मंगळवारी सकाळी पालिकेकडून परंपरेनुसार ओटी भरण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, राम हादगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगराध्यक्षा म्हणाल्या, ‘कास तलाव यंदा पंधरा दिवस अगोदरच तुडुंब भरला. त्यामुळे सातारकरांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली. नवीन कास धरणाचे काम पावसाळा संपताच पुन्हा गतीने सुरू होईल. काम पूर्ण झाल्यानंतर त्यात सध्याच्या तुलनेत पाचपट पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे सातारकरांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जाईल. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनीही कास धरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.
पाणीपुरवठा सभापती सीता हादगे म्हणाल्या, दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागतो. यंदा पाणीपुरवठा विभागाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे नागरिकांवर पाणीकपातीचे संकट ओढावले नाही. याचे समाधान वाटत आहे. सांबरवाडी तसेच शहापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता केली असून, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असला तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.