स्थैर्य, दि.३: अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनाच्या 110 दिवसानंतर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात सीबीआयला मदत करणा-या एम्सच्या पथकाने आपल्या अहवालात हत्येची शक्यता नाकारली आहे. वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एका बातचीत म्हटले आहे की, सुशांतचे प्रकरण क्लियर कट आत्महत्येचे प्रकरण आहे. त्याची हत्या झाली नव्हती. मात्र, अद्याप याची अधिकृतपणे सीबीआयने पुष्टी केलेली नाही.
व्हिसेरामध्ये विष आढळले नाही
सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. 28 सप्टेंबर रोजी एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. माध्यमांतील वृत्तानुसार, एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही.
कूपर रुग्णालयाला क्लीन चीट देण्यात आलेली नाही
सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार्या मुंबईतील कुपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना या अहवालात क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. परंतु त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतच्या गळ्यावर मिळालेल्या जखमांचा अहवालात उल्लेख नव्हता. शिवाय त्याच्या मृत्यूची वेळ देखील त्यात नमूद करण्यात आलेली नव्हती. यानंतर सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.
मुंबई पोलिसांच्या चौकशीत फाउल प्ले मिळाला नव्हता
सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनीही व्हिसेरा अहवाल प्रसिद्ध केला होता. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा तपासणीसाठी कलिना फोरेंसिक लॅबला देण्यात आला. प्रयोगशाळेने आपल्या अहवालात मृत अभिनेत्याच्या शरीरात कोणतेही संशयित रासायनिक किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते.