पंचायत समिती लिपिक वर्गाचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच


स्थैर्य, 3 मार्च, सातारा : जिल्ह्यातील पंचायत समितीतील लिपिक वर्गाचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच असून, अधिवेशनकाळात आंदोलन करता येणार नसल्याचे स्पष्ट आदेश सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. अधिवेशन सुरू असताना कामकाज ठप्प ठेवले, तर ’ना काम, ना वेतन’ची कारवाई होईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आंदोलन स्थगित होणार की आणखी तीव्र होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात सुमारे दीडशे ते दोनशे कर्मचारी सहभागी झाले आहेत. लिपिक वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन स्तरावर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सर्व लिपिक कर्मचार्‍यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, वेतन लागू होईपर्यंत लिपिक संवर्ग तलाठी, ग्रामसेवक आदी संवर्गाचे वेतन समकक्ष होते. मात्र चौथ्या वेतन आयोगानंतर सर्व संवर्गाचे वेतनस्तर वाढले, तरी लिपिकांचे वेतन वाढले नाही. हे वेतन तत्काळवाढवावे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व कक्ष अधिकारी या पदांचे एकत्रीकरण करावे, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक ही पदे एकत्रित करावी या प्रमुख मागण्या आहेत.

दरम्यान, अधिवेशनकाळात शासकीय कामकाज सुरळीत ठेवणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. नागरिकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. ’ना काम, ना वेतन’चा इशारा दिल्याने कर्मचार्‍यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!