स्थैर्य,कोल्हापूर,दि १२: बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावरील कानडी पोलिसांच्या समोरच आज कन्नडीगांनी हल्ल्याचा केलेला प्रयत्न, तसेच मराठी भाषिक फलकांना काळे फासण्याच्या प्रकाराचे संतप्त पडसाद कोल्हापूरात उमटले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कर्नाटक परिवहनच्या बसच्या कानडी फलकांना काळे फासून कर्नाटकात परत पाठविण्यात आले.
दरम्यान, यापुढे कर्नाटक परिवहनच्या एकही बस तसेच ट्रकना कोल्हापुरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून येथील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहारही यापुढे करू न देण्याचा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी यावेळी दिला आहे.
सीमाभागात मराठी भाषिकांवर जाणीवपूर्वक हल्ले
कर्नाटक सरकारच्या वरदहस्ताने कन्नडीगांकडून हल्ले होत आहेत. आज तर बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर एकटे असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. शिवाय मराठी भाषिक फलकांवर काळे फासून तोडफोडीचे प्रकार झाले. कानडी पोलिसांच्या समोरच मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा हा प्रकार झाल्याने येथील संतप्त शिवसैनिकांनी जिल्हा प्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जाऊन कर्नाटक परिवहनच्या फलकांना काळे फासले. तसेच मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली.