दैनिक स्थैर्य । दि. २० ऑगस्ट २०२२ । सातारा । गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या संकटामुळे डॉल्बी चालक आणि त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत आहेत त्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे मग साताऱ्यात डॉल्बी का वाजू नये याचे प्रशासनासह पोलिसांनी उत्तर द्यावे असा रोखठोक सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे डॉल्बीच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन व खासदार उदयनराजे भोसले आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.
शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात काही कामानिमित्त उदयनराजे यांनी आयोजित बैठका आटोपून प्रसार माध्यमांशी संवाद साधला . ते पुढे म्हणाले, ” साताऱ्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे. पोलिसांनी प्रशासनाला डॉल्बी का नको आहे याचे त्यांनी आम्हाला पहिल्यांदा उत्तर द्यावे सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली जावी याकरिता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता तेव्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकले मात्र नंतर पोलिसांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच अशी भूमिका मांडली.
उदयनराजे म्हणाले व्यवसायिकांच्या कुटुंबीयांचा प्रशासनाने एकदा तरी विचार केला पाहिजे . त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे डॉल्बीवर बंदी घातल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे सातारा शहरात डॉल्बीला बंदी आणि इतर ठिकाणी डॉल्बी मात्र जोरजोरात वाजते असा दुटप्पीपणा व्हायला नको . सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला परवानगी का नाही याचे पत्र काढावं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून निर्णय घेतले पाहिजे डॉल्बी वाजलीच पाहिजे अशी माझी भूमिका आहे दोन-तीन तासाने असं काय आभाळ कोसळणार आहे असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.