
स्थैर्य, फलटण, दि. 3 फेब्रुवारी : कोळकी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विरोधकांना चारी मुंडा चित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. आज कोळकीतील प्रतिष्ठित नागरिक आणि शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. याच वेळी दिशाभूल करून सेनेत नेण्यात आलेले युवा नेते ईश्वर भोसले यांनी पुन्हा स्वगृही प्रवेश केल्याने विरोधकांना चपराक बसली आहे.
कोळकीतील दिग्गजांचा भाजपावर विश्वास
आजच्या प्रवेश सोहळ्यात महादेव माळ (कोळकी) येथील प्राध्यापक हनुमंतराव गुलाबराव गुंजवटे सर (पुणे विभागीय पतसंस्थेचे माजी चेअरमन, कै. संजय गांधी विद्यालय व शरदचंद्रजी पवार ज्युनिअर कॉलेज, गुणवरे) आणि नरसोबा नगर (कोळकी) येथील प्रतिष्ठित सुनील लक्ष्मण वाकडे साहेब (निवृत्त उपविभागीय अभियंता, महावितरण व सामाजिक कार्यकर्ते) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. या दिग्गजांच्या प्रवेशामुळे कोळकीतील सुशिक्षित आणि नोकरदार वर्गाचा पाठिंबा भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे व विकास नाळे यांनाच मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.
ईश्वर भोसलेंची ‘घरवापसी’; विरोधकांचा डाव फसला
राजे गट प्रणित शिवसेनेने दिशाभूल करून प्रवेश करून घेतलेले कोळकीचे धडाडीचे युवा नेते ईश्वर भोसले यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात अर्थात भाजपात प्रवेश केला आहे. युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत ईश्वर भोसले यांनी “माझे घर भाजपाच आहे, विरोधकांच्या भुलथापांना यापुढे बळी पडणार नाही,” असे सांगत पुन्हा कमळाचे काम जोमाने सुरू केले आहे. यावेळी पै. किरण जाधव आणि उदयसिंह निंबाळकर उपस्थित होते.
जयकुमार शिंदे व विकास नाळेंची ताकद वाढली या पक्षप्रवेशावेळी सुशांत भैय्या निंबाळकर, मधुकर भोईटे, किरण जाधव, ॲड. सागर सस्ते, योगेश रिटे आणि वैभव गंगतीरे यांसारखे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा. गुंजवटे सर आणि अभियंता वाकडे साहेब यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वांनी भाजपात प्रवेश केल्याने कोळकी जिल्हा परिषद गटातील प्रचाराचा दर्जा उंचावला आहे. जयकुमार शिंदे यांचा प्रशासकीय अनुभव आणि विकास नाळे यांची कार्यपद्धती पाहूनच या मान्यवरांनी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, ईश्वर भोसलेंच्या घरवापसीमुळे कोळकीतील युवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, सह्याद्री चिमणराव कदम आणि डॉ. अशोक नाळे यांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
