खंबाटकी बोगद्याजवळ अपघात ट्रकने तीन गाड्यांना ठोकरले; एक दुचाकीस्वार ठार सहा जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | सातारा | पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्या नजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.याच परिसरात उतारावरून पुण्याकडे भरधाव वेगात जात असणाऱ्या मालट्रकने तीन गाड्यांना ठोकरल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले.

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्या नजीक धोम बलकवडी कालव्याजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे (रा. सासवड जि. पुणे) हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिके मधून खंडाळा रुग्णालयात पाठवले.दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले.

दरम्यान याच परिसरात उतारावरून भरधाव वेगात आलेला मालट्रक क्र .(केए-२७ – ए– ९०१९) ने डस्टर, क्रेटा व इर्टिका कारला धडक दिली. यामध्ये क्रेटा कारचा पूर्ण चक्काचूर झाला. खंडाळा व महामार्ग पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. जखमी सहा जणांना उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले.दिवाळी सुट्टी संपल्याने महामार्गावर पुण्यामुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी महामार्गावर आहे. अपघात स्थळापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व जखमी खराडी (पुणे) येथील आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी मदत केली.अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!