दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिर सस्तेवाडी, (ता. फलटण) येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला.
या सप्ताहात सोमवार, दि. २२ जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली, दुसरी या स्तरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या साहित्य पेट्या व साहित्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृती घेण्यात आल्या. त्या साहित्याचा वापर करून मुलांना आनंददायी शिक्षण दिले गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे गटामध्ये सादरीकरण घेण्यात आले. तसेच ठसे काम, गोष्टींचा कट्टा इत्यादी उपक्रम घेण्यात आले. तसेच इयत्ता -तिसरी, चौथीच्या वर्गांसाठी माझे कुटुंब, कार्ड तयार करणे, कथाकथन, शब्द पट्ट्यांचा वापर यासारखे साहित्य वापर करून विविध उपक्रम घेण्यात आले.
मंगळवार, २३ जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस अंतर्गत एफएलएन अंतर्गत दिवसाची सुरुवात मी पण प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. गणितीय कोडी खेळ तसेच विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून हसत खेळत व्यवहार ज्ञान व गणिती क्रिया, कालमापन, संगीतमय पाढे यासारखे उपक्रम घेण्यात आले.
बुधवार, २४ जुलै रोजी क्रीडा दिवसाचे औचित्य साधून नवीन शैक्षणिक धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. या दिवसाची सुरुवात क्रीडा शपथ घेऊन करण्यात आली. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना खेळ व फिटनेचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये सापशिडी, भोवरा, लंगडी, फुगडी ,आंधळी- कोशिंबीर, लिंबू- चमचा, दोरीवरच्या उड्या या प्रकारे खेळ घेण्यात आले. मुलांनी या खेळांचा खूप आनंद घेतला.
गुरुवार, २५ जुलै रोजी सांस्कृतिक दिवस प्रशालेमध्ये खूपच आनंदाने आणि उत्साहाने साजरा झाला. यावेळी भारतीय कला आणि संस्कृतीची विविधता, दर्शवणारे उपक्रम प्रसारित घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा मध्ये येऊन विविधतेत एकता हा संदेश दिला.वेशभूषा, चित्रकला, नृत्य, गाणी, नाट्य, यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच परिसरातील स्थानिक कलाकार यांच्याशी संवाद साधून भेटीचे आयोजन करण्यात आले.
शनिवार, २७ जुलै रोजी इको क्लब/शालेय पोषण आहार दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली.
रविवार, २८ जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस प्रशालेमध्ये आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला या अंतर्गत विद्यांजली पोर्टलवर शाळा नोंदणी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी साहित्य व उपकरण यांचे योगदान देणारे यांच्या विषयी उत्तरदायित्व निर्माण करण्यात आले. शाळेला मदत करणार्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे शाळेचे दर्शनी फरकावरती लिहून त्यांच्या विषयी कृतज्ञता निर्माण करण्यात आला. विद्यांजली फेरीचे आयोजन करण्यात आले.
सोमवार, दि. २९ जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस अंतर्गत देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाचे महत्त्वपूर्ण भूमिका आहे म्हणून एक दिवस कौशल्य आणि डिजिटल शिक्षण या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संवाद कौशल्य, विक्री कौशल्य, ग्राहक व सेवा व उत्पादने या विषयी माहिती देणारी नाटिका सादर करण्यात आली. निसर्ग शेतीतून अध्ययन करण्यासाठी रोपवाटिका, गाईचा गोठा, पेरू व चिकूची बाग, खत निर्मिती, व शेतीशी संबंधित अध्ययन अध्यापन अनुभव देण्यात आले.
मातीकामांतर्गत मातीच्या वस्तू तयार करणे व मातीच्या वस्तूंचे वर्णन व खेळाद्वारे शिक्षण देण्यात आले. डिजिटल बोर्डद्वारे अध्ययन अध्यापन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन या शैक्षणिक सप्ताहाची सांगता झाली.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आनंदी वातावरणामध्ये शैक्षणिक सप्ताह साजरा केला. या सप्ताहातून विद्यार्थ्यांना नाविन्यतेने शिकण्याचा आनंद मिळाला. तसेच पालकांनाही याविषयी माहिती मिळाली. याबद्दल सर्व समिती, स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी व पालकांनी या उपक्रमांचे कौतुक केले.