
स्थैर्य, बारामती, दि. 28 ऑगस्ट : ’ निराशा जनक परिस्थितीत आपण संकल्प शक्ती, इच्छाशक्ती, विवेक शक्ती आणि साधना शक्तीच्या आशेचा किरण या संधीमध्ये परिवर्तित करू शकतो. आपल्यात आंतरिक बदल घडवून पारमार्थिक विकास घडवू शकतो. भगवद्गीतेच्या श्रवणातून व शास्त्राच्या अभ्यासाने दृष्टिकोन बदलण्याची क्षमता निर्माण होेते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, इस्कॉनचे जीबीसी सदस्य, श्रीमान गोरांगदास यांनी केले. येथील इस्कॉनवतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव 2025’ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विकास ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रदादा पवार, उद्योजक भारत गावडे पाटील, सावंत विश्वचे ओम सावंत, हनुमंत येडे, विद्या प्रतिष्ठानच्या सचिव अॅड. नीलिमाताई गुजर, नेचर डिलाईट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अर्जुन देसाई, बारामती उपविभागाचे प्रांताधिकारी वैभव नवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमान गोरांददास म्हणाले, आपण जोपर्यंत निरपेक्ष कर्तव्य करीत नाही. तोपर्यंत भगवंत प्रकट होणार नाही. आपण आपल्या जीवनात स्नेह, भाव आणि अनुरागाचा संबंध भगवंतांशी प्रस्थापित करू शकतो’, हा गीतेचा संदेश त्यांनी दिला. भगवद्गीतेच्या श्रवणातून व शास्त्राचाअभ्यास करून दृष्टिकोन बदलण्याची क्षमता विकसित करून भौतिक जगातील भोगविलासातून मुक्त होऊन भगवंतांच्या सेवेत जोडण्याचा मूलमंत्र त्यांनी आपल्या प्रवचनातून दिला. सत्संगामुळे उचित आणि अनुचित अनुसंधानात राहून जीवनाचे कल्याण साधू शकतो. साधूकृपा आणि हरिनामाशिवाय भगवंतांप्रति प्रेम शक्य नाही असा मूलभूत संदेश त्यांनी दिला. कुठल्याही विपरीत परिस्थितीत निराश न होण्याची आणि उत्साह, निश्चय, ध्येय आणि प्रयत्न टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित तरुणाईला उद्देशून केले.
श्रीमान नंददुलाल प्रभुजी म्हणाले, ’ प्रवास आत्मशोधाचा’ या गीता कोर्सच्या प्रशिक्षण वर्ग नोंदणीसाठी आवाहन देखील केले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्रीमान कृपासिंधू प्रभू यांचे कीर्तन, श्रीश्री राधा गोविंदजी यांचा महाअभिषेक, ’हरी सुंदर नंद मुकुंदा’ हे बालनृत्य, नाटिका- भक्ताधीन कृष्ण’, श्रीमान गोरांग प्रभुजी यांच प्रवचन, महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी इस्कॉन बारामतीचे नंददुलाल प्रभू, सुधीर चैतन्य प्रभू, उषामती माताजी आणि मंदिर व्यवस्थापन समिती यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कृष्ण भक्तीचा हा दीप सर्वांच्या हृदयात प्रज्वलित ठेवण्यासाठी इस्कॉन बारामती नेहमीच प्रयत्नशील आणि कृतिशील असते असे दृकश्राव्य माध्यमातून पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रा. नीलिमा पेंढारकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किशोर रुपनवर यांनी आभार मानले.