रयत शिक्षण संस्थेमार्फत १३५ व्या कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के उपस्थित राहणार


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा ।  येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ तीर्थरूप कर्मवीर अण्णा यांची १३५ वी जयंती रयत शिक्षण संस्था व संस्थेच्या सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखांच्या वतीने गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी दिली. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता संस्थेचे सर्व पदाधिकारी , सेवक विद्यार्थ्यांच्या वतीने कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांची गाडी तसेच तैलचित्रासह चित्ररथ,विद्यार्थी व रयत सेवक प्रभात फेरीत सहभागी होतील.यावेळी सातारा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना संस्थेचे सचिव प्रि.
डॉ. विठ्ठल शिवणकर ,सहसचिव प्रि.डॉ.शिवलिंग मेंनकुदळे [उच्च शिक्षण] सहसचिव मा.राजेंद्र साळुंखे हे पुष्पहार घालून अभिवादन करणार आहेत. कर्मवीर जयंतीचा मुख्य कार्यक्रम सकाळी ११ वाजता कर्मवीर समाधी परिसरात आयोजित केलेला आहे.रयत शिक्षण
संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारया या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा.प्रा.डॉ.डी.टी.शिर्के हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने दि रयत सेवक कॉ.ऑप.बँकेच्या वतीने दुपारी ३ वाजता आर्यांग्ल हॉस्पिटल व सायंकाळी ४ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात येणार आहेत. तसेच बुधवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रक्तदान शिबिरासाठी संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय,आझाद कॉलेज ऑफ एजुकेशन,सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा तसेच,इस्माईल साहेब मुल्ला लों कॉलेजचे विद्यार्थी व रयत सेवक सहभागी होणार आहेत. या सर्वच उपक्रमांना सातारा शहरातील शिक्षणप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!