
दैनिक स्थैर्य | दि. २९ एप्रिल २०२३ | फलटण |
बुद्धांकूर तरुण मंडळाच्या वतीने पिंप्रद, ता. फलटण येथे १३२ वी ‘भीम जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पिंप्रदची भीमजयंती ३ दिवस साजरी केली गेली. दिनांक २१ पासून जयंतीला सुरवात झाली. या दिवशी भीमगीतांचा सुरेल असा ऑर्केस्ट्रा सादर झाला. त्यानंतर २२ तारखेला संध्याकाळी महाभोजन दान कार्यक्रम घेण्यात आला.
दिनांक २३ एप्रिल रोजी ४.०० वाजता विविध स्पर्धा व पारंपरिक खेळ घेण्यात आले. त्यानंतर ६.३० वाजता माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, आयकर आयुक्त तुषार मोहिते, महावितरणचे योगेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे आणि ठाणे पोलीस अभिजित मोरे, अभिनेता रवींद्र पालखे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारे तसेच वेबसिरीजच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे, ‘चांडाळ चौकडी’च्या संपूर्ण टीमने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी विश्वासराव भोसले, तुषार मोहिते यांनी आपापली मते व्यक्त करून मार्गदर्शन केले. तसेच चांडाळ चौकडीच्या टीमने देखील समाज प्रबोधनवर भाषणे केली.
या तीन दिवसाच्या जयंतीच्या कार्यक्रमात बुद्धांकूर तरुण मंडळाने १३२ व्या जयंतीनिम्मित १३२ वृक्ष वाटप केले तसेच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ आणि ‘डॉ. आंबेडकरांचे जातीव्यवस्थेचे निर्मूलन’ ही पुस्तके वितरित केली आणि विशेष म्हणजे बुद्धांकूर तरुण मंडळाच्या वतीने पिंप्रद मध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरू इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सिद्धार्थनगरमधील विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप केले आणि अशा गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शालेय शिक्षणासाठी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च बुद्धांकूर तरुण मंडळ करणार आहे.जयंती कार्यक्रमांना पिंप्रद मधील सर्व तरुण मंडळे यांनी परिश्रम घेतले.