कृष्णा विश्व विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत सोहळा सपंन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ फेब्रुवारी २०२३ । कराड । लोकांना तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाल्याने लोक जागरुक झाले आहेत. अशावेळी बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत, विद्यार्थ्यांनी भविष्यात वाटचाल करताना आपले सामाजिक उत्तरदायित्व जपले पाहिजे. वैद्यकीय शिक्षणाची पदवी प्राप्त केल्यानंतर ग्रामीण भागात सेवा देणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असून, सामाजिक दृष्टिकोन बाळगून काम करा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या ११ व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.
कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस दलाच्या विशेष बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर इजिप्शियन सिनेटच्या सदस्य व मर्क फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राशा केलेज, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, डॉ. दिपक टेम्पे, डॉ. सबिता राम, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, संशोधन संचालक डॉ. प्रमोद जॉन, डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅाडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इजिप्शियन सिनेटच्या सदस्य व मर्क फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राशा केलेज यांना, आरोग्य क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल विद्यापीठातर्फे ‘डी.लिट’ सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ना. विखे-पाटील म्हणाले, सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांनी दूरदृष्टी ठेऊन ‘कृष्णा’च्या रुपाने लावलेल्या रोपट्याचा आज डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. कोविड काळात कृष्णा हॉस्पिटलने मोठे काम केले असून, ते कौतुकास्पद आहे. शिक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाबरोबर काळानुरूप बदल करण्याची गरज असून, संशोधनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्र हे समाजसेवेचे, मानवतेचे आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की कृष्णा विश्व विद्यापीठ ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून संशोधन, नवनिर्मितीला चालना देणारे ज्ञानकेंद्र आहे. विशेषत: वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्याचे कार्य करतानाच, तळागाळातील समाजापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे आणि आरोग्याबाबत लोकजागृती करण्यावे काम कृष्णा विश्व विद्यापीठ करत आहे. कृष्णा हॉस्पिटलने कोविड काळात ९००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. शिरवळ येथे लवकरच विद्यापीठाचा नवीन कॅम्पस विकसित करण्यात येणार आहे.
‘डी.लिट’प्राप्त डॉ. राशा केलेज म्हणाल्या, कृष्णा विश्व विद्यापीठ ‘क्लास वन’ विद्यापीठ असून, त्यांनी मला डी.लिट पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आमच्या फौंडेशनच्या माध्यमातून आत्तापर्यंत ५० देशांतील शेकडो विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात आली असून, या कामात मला माझ्या कुटुंबीयांसह समाजाचेही मोठे सहकार्य लाभले आहे.
सोहळ्याला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. टी. मोहिते, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे विभागप्रमुख डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. आर. सी. डोईजड, अधिष्ठाता डॉ. सौ. सुप्रिया पाटील, डॉ. सौ. रेणुका पवार, डॉ. टी. पूविष्णू देवी, डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. स्नेहल मसूरकर, डॉ. अक्षदा कोपर्डे, डॉ. स्वप्ना शेडगे, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईशा ठरली ५ पदकांची मानकरी
एमबीबीएस अधिविभागातील कु. ईशा या विद्यार्थीनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व. गोविंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक, स्व. डॉ. एम. एस. कंटक ॲवार्ड, यू.एस.व्ही. पदक, डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार, डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार अशी एकूण ५ पदके पटकाविली. विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व. जयवंतराव भोसले सुवर्णपदक मुस्कान दिपक आहुजा हिने; तसेच बीडीएस अभ्यासक्रमाच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना देण्यात येणारे स्व. जयमाला भोसले सुवर्णपदक अनेरी अशोक वाईकर या विद्यार्थीनीने पटकाविले. तसेच अक्षता फडतरे, कु. अथिरा, धृती रंगेन, प्रतीक श्रीवास्तव, अमित खंडागळे, छवी शृंगारपुरे, जोशुआ फोन्सेका, विल्सन घाटगे, डॉ. अवंती दामले, डॉ. ऋतुजा जाधव, डॉ. राधा बावगे यांनीही विविध पारिताषिके पटकाविली.
‘कृष्णा’ व ‘प्रवरा’चा वारसा कायम
कृष्णा आणि प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना एकाचवेळी झाली. आमच्या वडिलांनी आणि आप्पासाहेबांनी केलेल्या या सामाजिक कार्याचा व ज्ञानदानाचा हा वारसा आम्ही अविरतपणे जोपासत आहोत. डॉ. अतुल भोसले हे उद्याचे भविष्य असून, त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे प्रतिपादन ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केले.

Back to top button
Don`t copy text!