ना.श्रीमंत रामराजे व आ.दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे चवणेश्‍वरचा गेलेला 1 कोटी 33 लाखांचा निधी परत मिळाला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.२४ : स्थैर्य, फलटण दि.23 : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ असलेल्या चवणेश्‍वरसाठी जाहीर झालेला 1 कोटी 33 लाखांचा निधी लॉकडाऊन काळात शासनाकडे परत गेला होता. मात्र याबाबत शासनस्तरावर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाइॅक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या पाठपुराव्यामुळे हा परत गेलेला निधी शासनाकडून परत मिळाला आहे. यामुळे ग्रामस्थांसह भाविकांमधून समाधानाचे वातावरण आहे.

कोरेगाव व वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या चवणेश्‍वर गावाला वीस वर्षापूर्वी ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने पर्यटन स्थळाचा क वर्ग दर्जा मिळाला होता. मध्यंतरी राज्य शासनाने सुमारे एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी येथील रस्त्यासाठी मंजूर केला होता. वनविभागाची अडचणी असल्याने सदरचा निधी खर्च झाला नव्हता. 2019 मध्ये वनविभागाची अडसर दूर झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया गतीने होण्याची आवश्यकता होती मात्र तसे झाले नाही. यादरम्यानच्या काळात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झाला. सातारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. परिणामी मंजूर झालेला निधी माघारी शासनाकडे गेला.

या रस्त्याचा निधी परत मिळावा यासाठी चवणेश्‍वरचे सरपंच दयानंद शेरे, माजी सरपंच सौ. नीता पवार, हरिदास शेरे, युवराज शेरे आदींनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. आ. दीपक चव्हाण यांनी घाटरस्त्याची पाहणी करुन जोपर्यंत निधी परत येत नाही तो पर्यंत श्री चवणेश्‍वराच्या दर्शनाला जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर या रस्त्यासाठी ना.श्रीमंत रामराजे, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मंगेश धुमाळ यांनी त्यांच्या स्तरावर जोरदार प्रयत्न केले आणि हा निधी परत आणण्यात त्यांना यश आले.


Back to top button
Don`t copy text!