दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२४ | फलटण | महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तथा नवनिर्वाचित आमदार सचिन सुधाकर पाटील यांना कोळकी गावामधून तब्ब्ल २५९ चे मताधिक्य मिळाल्याने कोळकी ग्रामस्थांचे आभार मानत आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या वतीने कोळकी गावातील जनतेला आश्वासित करू इच्छितो कि; गावच्या विकासासाठी आम्ही कमी पडणार नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण व इतर वेळी समाजकारण हीच शिकवण हि आम्हाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली असल्याने आगामी काळात सर्वांनी एकत्रित येत कोळकी गावाचा विकास करण्याचे आश्वासन यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिले.
आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन पाटील यांना निवडून आणण्यासाठी ज्ञात व अज्ञात रूपे ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली आहे; ती आम्ही कधीही विसरणार नाही. कोळकी गावासह कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून विविध विकासकामे हि मार्गी लावली जातील. यासोबतच कोळकी जिल्हा परिषद गटामधील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आपली संपूर्ण ताकद लावली अश्या सर्वांचे सुद्धा आभार यावेळी जयकुमार शिंदे यांनी मानले.