दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । ठाणे । राष्ट्रीय मतदार दिनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उत्कृष्ट कार्य करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, ईआरओ, नायब तहसीलदार आणि बीएलओ यांना पुरस्कार जाहीर केले असून कोकण विभागात ठाणे जिल्ह्याला दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना कोकण विभागात उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी असा पुरस्कार राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या बीएलओ निर्मला बिरारी यांना उत्कृष्ट बीएलओचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने जिल्ह्यात मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम आणि विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल हे पुरस्कार मिळाले आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणी आणि मतदार याद्या निर्दोष करण्याचे काम करण्यात आले. त्यासाठी जिल्हा यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली आहे, अशी भावना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. ०१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९ एवढी झाली आहे.
ठाणे जिल्हयामध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ पूर्वी व विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर ठाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण (जेंडर रेशिओ) ८४१ वरून ८४३ झाले आहे. दि.१ जानेवारी २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले ८ लाख ३५ हजार ५०८ इतके मतदार होते. कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी कार्यालयमधील अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ यांच्या प्रयत्नाने स्थलांतरित झालेल्या व छायाचित्र नसलेल्या ५ लाख १० हजार ३०१ इतक्या मतदारांची वगळणी करण्यात आली आहे.
महानगरपालिका,नगर परिषद व नगर पंचायत यांच्या निवडणूकीसाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी व्हावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी SVEEP कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नार्वेकर यांनी ठाणे जिल्हयातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथील राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यांना जास्तीत जास्त मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्यासाठी विनंती करण्यात आली होती.
मतदार नोंदणी जनजागृतीसाठी ठाणे शहरातील रेल्वे स्थानक, बस स्थानक, घंटा गाडी, तीन चाकी गाडी यांचे द्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच स्वीप कार्यक्रमांची विविध माध्यमांद्वारे संदेश, मालमत्ता कर पाणीपट्टी देयकावर संदेश छापून जनजागृती करण्यात आली. स्थानिक संस्थांच्या कार्यलयात कम्युनिटी फॅसिलीटी सेंटर (CFC) सुरू करून तेथे भेट येणाऱ्या अभ्यागतांना वोटर हेलपलाईन ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुविधांबाबतची माहिती देण्यात आली.
तृतीय पंथी व वंचित घटकातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांची बैठक घेऊन वंचित घटकांतील मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. भिवंडी, उल्हासनगर व कल्याण येथे शिबिरे आयोजित करण्यात आली. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ७४२ तृतीय पंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अन्य जिल्हयांच्या तुलनेत ठाणे जिल्हयामध्ये सर्वात जास्त तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी झाली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा दरम्यान सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम, नवीन गृहनिर्माण सोसायटी, वंचित महिला, तृतीयपंथी, आदीवासी पाडे, मोठमोठ्या औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हास्तरावर घेण्यात आल्या. मतदार नोंदणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय विशेष शिबिरांचे नियोजन करून कार्यक्रमांची आखणी करुन देण्यात आली. यासर्व उपक्रमांची दखल घेऊन ठाणे जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी आणि सर्वोत्कृष्ट बीएलओ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.