दैनिक स्थैर्य । दि. ०४ मे २०२३ । मुंबई । खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचेही ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत. बारसू ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थनासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जे पत्र दिले त्याची किंमत शंभर कोटी होती. आता विरोधासाठी किती घेणार? अडीचशे कोटी की ५०० कोटी ते जाहीर करावे असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी राणे म्हणाले, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बुधवारी बेळगाव येथे गेले होते. कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिथे त्यांनी सभा घेतली. मोठया तावा-तावाने ते बोलत होते. मराठी बांधवांसाठी प्रचाराला गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मी पुन्हा पुन्हा सांगतो की, हिंमत असेल तर पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल त्यांनी बोलावे. त्यांना मराठी माणसांबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. संजय राऊत यांनी आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आग लावली. तर सामनात आग्रलेख लिहून पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न त्यांनी आता केला आहे.
संजय राऊत यांचे म्हणणे आहे की, बेळगाव आंदोलनाशी भाजपचा काही संबंध नाही. मात्र, त्यांनी एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्यावं की, बाळासाहेबांचं बेळगावसाठी आंदोलन सुरू होत तेव्हा ते कुठे होते ?
पवार कुटुंबियांमध्ये आग लावण्याचे काम
सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये आग लावण्याचे काम आजच्या सामना मधील अग्रलेखामधून करण्यात आले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांना मी विनंती करतो की, संजय राऊत यांना घरी घेऊ नका. ते घरी घेण्याच्या लायकीचे माणूस नाहीत. त्यांचा एक डोळा पवार कुटुंबावर आहे तर एक डोळा तेजस व आदित्य ठाकरेंवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शकुनी मामा बनून ते फिरत असल्याची टीकाही नितेश राणे यांनी केली.