दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई । राजकीय वर्तुळात सध्या सभांचा धडाका सुरू आहे. आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात प्रामुख्याने महाविकास आघाडीने ठिकठिकाणी सभा घेत सत्ताधारी भाजपा-शिवसेना यांच्यावर निशाणा ठेवला आहे. तर दुसरीकडे वैयक्तिकरित्या पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे हेदेखील सभा घेत आहे. आतापर्यंत खेड, मालेगाव इथं उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यानंतर आता पाचोरा इथं उद्धव ठाकरेंची सभा होईल. परंतु त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचाही धुरळा उडणार आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी राज्यभरात सभा होतील असं म्हटलं होते. त्यानंतर आता ६ मे रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. परंतु त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांची महाड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. राज यांची रत्नागिरीच्या जवाहर मैदानात ही सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जाणार आहे. मात्र योगायोगाने ठाकरे बंधुची तोफ एकाच दिवशी धडाडणार असल्याने या सभेत राज आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
अलीकडच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत सातत्याने भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला टार्गेट करण्यात येत आहे. गद्दार, बाप चोरणारी टोळी म्हणून उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासह समर्थकांना हिणवत असतात. तर आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही असं सांगत उद्धव ठाकरे भाजपाला टोला लगावतात. महाविकास आघाडी सभेतही काँग्रेस-राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे मिळून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतात. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सभेतून मविआने भाजपावर आरोप केले. आता महाविकास आघाडीची सभा मुंबईत पार पडणार आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन नवी वाटचाल सुरू केली आहे. राज यांनी गेल्यावर्षी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा विषय हाती घेत तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरले होते. मशिदीवरील भोंग्यावरून मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. बाळासाहेबांनी दिलेले शिवधनुष्य उद्धव ठाकरेंना पेलवले नाही असा आरोप राज यांनी केला. त्यासोबतच माहिम येथील मजारच्या बांधकामाबाबत व्हिडिओ दाखवत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला होता. मात्र त्यानंतर अवघ्या १२ तासांत सरकारने राज ठाकरेंच्या भाषणाची दखल घेत माहिम येथील अनधिकृत बांधकाम असलेली जागेवर तोडक कारवाई केली. मात्र राज ठाकरे आणि शिंदे-भाजपाची ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे राज ठाकरे ६ मे रोजीच्या सभेत कुणाला टार्गेट करणार हे पाहणे गरजेचे आहे.