यंत्रमागधारकांच्या लेखी सुचनांचा धोरणात्मक बदलांमध्ये समावेश करणार – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२४: राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या जातील. यंत्रमागधारकांनी आपल्या सूचना लेखी स्वरुपात द्याव्यात, त्या अनुषंगाने धोरणात्मक बदल करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी यंत्रमागधारकांच्या शिष्टमंडळास दिली.

मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय निवासस्थानी राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध समस्यांबाबत बैठक झाली. राज्यातील 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीजदरात प्रतियुनिट 0.75 पैसे सवलत देणे, यंत्रमागधारकांना मल्टी पार्टी वीज जोडणी देणे, यंत्रमाग उद्योजकांनी घेतलेल्या कर्जावर व्याज दरात 5 टक्के सवलत योजनेतील त्रुटी दूर करणे अशा विविध विषयांच्या अनुषंगाने यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

श्री. शेख म्हणाले की, अन्य उद्योगांप्रमाणेच वस्त्रोद्योग क्षेत्रालाही टाळेबंदीचा फार मोठा फटका बसलेला आहे. वस्त्रोद्योग हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार मुफ्ती महंमद इस्माईल, राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, आयुक्त शीतल वागळे व वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात सतीश कोष्टी, सागर चाळके, मदन कारंडे, अमित गाताडे, राजाराम धारवट, राहुल खंजिरे, उदयसिंग पाटील आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!