दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | प्रतापगडावरील ऐतिहासिक अफझलखान भेटीप्रसंगी दगाबाजी करणाऱया अफझलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांचा वार करुन बाहेर काढला. त्याच वेळी बेसावध छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीने वार करणारा शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी हा दगाबाज निघाला. मात्र, महाराजांनी कुलकर्णींचे खांडोळे केले. हा दिवस 10 नोव्हेंबर 1659 होता. हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू असलेली घटना असून बुधवार दि. 10 रोजी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीतर्फे कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खान वध दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांनी दिली.
यासाठी साताऱयातील विश्रामगृहात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय रक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस अमर गायकवाड तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
टेक्सास गायकवाड यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करण्याच्या उद्देशाने आलेल्या अफझलखानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला. अफझलखान शामियान्याच्या बाहेर दगा दगा ओरडत बाहेर आला. त्यावेळी हिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदू असलेल्या कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी डोक्यावर तलवारीचा वार केला. मात्र महाराजांनी कुलकर्णीची खांडोळी करुन टाकली.
जर त्याक्षणी खरंच कृष्णा कुलकर्णीला मारल्यावर ब्रम्हहत्या घडते का ? याला मारावे की सोडवे ? अशा विचारात छत्रपती शिवाजी महाराज गढून गेले असते तर कुलकर्णीने महाराजांचा जीव घेतला असता. मग छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न साकार झाले असते का? भारतीय इतिहासात शौयाची, स्वाभिमानाची, स्वराज्याची गौरवास्पद म्हणून ओळखली जाणारी मराठेशाही अस्तित्वात आली असती का ? असा सवाल करत टेक्सास गायकवाड म्हणाले, म्हणूनच कुलकर्णीचा झालेला वध हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू ठरतो.
अफझलखान वधावरुन हिंदू-मुस्लिमांमध्ये विषाची बिजे पेरणाऱयांपासून सावध राहून अशांत भारताला धार्मिक दंगलीतुन मुक्त करण्यासाठी व प्रगतीशील मार्गावर नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठीच 10 नोव्हेंबर रोजी साजऱया होणाऱया कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यदिन म्हणून साजरा करण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
माध्यम प्रतिनिधींकडून आक्षेप
पत्रकार परिषदेत मुख्य विषय होता कृष्णा कुलकर्णी वध दिन. मात्र, हे टेक्सास गायकवाड सांगत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियान्यात अफझलखानाला जखमी केले व तो बाहेर आला असा उल्लेख केला तसेच शासनाने शिवप्रताप दिन साजरा करु नये, त्या ऐवजी कृष्णा कुलकर्णी वध दिन साजरा करावा, असे सांगितले. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना रोखले. तुम्ही तुमची माहिती द्या पण ही चुकीची मागणी असल्याचे सांगितले. त्यावर मग अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मारला हे का नाकारताय असाही सवाल उपस्थित केला गेला. त्यावेळी गायकवाड व माध्यम प्रतिनिधींमध्ये तणातणी झाली.