क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात ‘ट्रूनॅट’ मशीनद्वारे होणार COVID-19 च्या चाचण्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 29 : कोव्हिड-19 आजाराची लक्षणे असलेल्या गंभीर रुग्णांच्या घशातील स्रावांच्या चाचण्यांसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांना आता पुणे किंवा इतर ठिकाणच्या प्रयोगशाळांवर अवलंबून रहावे लागणार नाही. या प्रकारच्या चाचण्यांसाठी जिल्हा रुग्णालयात ‘ट्रूनॅट’ हे अद्ययावत मशीन बसविण्यात आले असून, या मशीनद्वारे चाचण्या करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर) आणि नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स) यांनी मान्यता दिली आहे.

या मशीनद्वारे गंभीर रुग्णांच्या चाचण्या तातडीने करून त्यांचे अहवाल लवकर मिळते शक्य होणार आहे. या मशीनद्वारे एका दिवसाला 35 ते 40 चाचण्या करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ‘ट्रूनॅट’ मशीनद्वारे क्षयरोग्यांच्या स्रावांचे नमुने तपासण्यात येतात. या मशीनमध्ये औषध प्रतिबंधक क्षयरोगाच्या चाचण्या करण्यात येतात. आता या मशीनद्वारे कोव्हिडच्या चाचण्यांनाही आयसीएमआरने मान्यता दिली आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात हे मशीन बसविण्यात आले आहे. त्याद्वारे चाचण्या करण्यास मान्यता मिळावी यासाठी एम्सकडे मागणी करण्यात आली होती.

संदर्भातील पत्राची आयसीएमआरने समीक्षा केली होती. नागपूर येथील एम्सच्या मायक्रोबायॉलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. मीरा शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयातील सुविधा, मशीन आणि या चाचण्यांसाठी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले प्रशिक्षण आदींचा आढावा आणि गुणवत्तेची तपासणी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट मशीनद्वारे कोव्हिड-19 च्या चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मशीनद्वारे संशयित रुग्णांच्या घशातील स्रावांच्या आरडीआरपी व रिअल टाइम-पीसीआर या पद्धतीने चाचण्या करण्यात येतात. दिवसभरात 35 ते 40 चाचण्या करता येतील. त्यामुळे गंभीर लक्षणे आणि अतितातडीचे उपचार आवश्‍यक असलेल्या रुग्णांच्या चाचण्या त्वरित करून त्यांचे अहवालही तात्तडीने मिळणार आहेत. या चाचण्यांसाठी अन्य प्रयोगशाळांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होणार आहे.

हे मशीन उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन खाली जिल्हा क्षयरोग केंद्रातील डॉ. श्रीमती ए. व्ही. जाधव, कर्मचारी, नोडल ऑफिसर व जिल्हा रुग्णालयातील डॉ. सारिका बडे व प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी परिश्रम घेतले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!