स्थैर्य, सोलापूर, दि.20 : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोना रूग्णांवर तात्पुरते उपचार याठिकाणी व्हावेत यासाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्यास मान्यता देत असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अक्कलकोट येथील पंचायत समिती सभागृहात कोरोना उपाययोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सभापती सुनंदा गायकवाड, नगराध्यक्ष शोभा खेडगी, प्रांताधिकारी ज्योती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, तहसीलदार अंजली मरोड, गट विकास अधिकारी महादेव कोळी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रांताधिकारी श्रीमती पाटील यांनी कोरोना रुग्णांची माहिती दिली. तालुक्यात 28 रूग्ण असून यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे.9 रूग्ण बरे होऊन घरी गेले तर 15 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
श्री. भरणे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ते म्हणाले, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम करायला हवे. हॉस्पिटलचे कामही त्वरित सुरू केले जाणार असून कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य रूग्णांवर उपचार होतील, गंभीर रूग्ण सोलापूरला पाठविण्यात येतील. शहरातील रूग्ण संख्या कमी करण्यासाठी पंढरपूर पॅटर्नची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी करा. यासाठी कंट्रोल रूम तयार करा, स्वाब घेतलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करा. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. खासगी दवाखान्यात गेलेल्या रुग्णांची माहिती दवाखान्याच्या डॉक्टरांनी द्यायला हवी. कोरोनाशी लढा देण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे, काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्या. कोणावरही टीका करू नका. जनतेला तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
कोरोना काळात दुधनी आणि मैंदर्गी नगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षण करण्यासाठी करार पध्दतीने आरोग्यसेविका घेण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.
श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यात गंभीर रुग्णांवर सोलापुरात चांगले उपचार होत असल्याचे सांगितले. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी सोलापूरला जाणाऱ्या नागरिक आणि रुग्णांवर ग्राम समितीमार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. कर्नाटक सीमा पूर्णपणे बंद करू, असेही ते म्हणाले.
यावेळी अक्कलकोटमध्ये डायलिसिस हॉस्पिटल, अक्कलकोट- सोलापूर मार्ग काही दिवस पूर्ण बंद ठेवण्याच्या सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांनी केल्या.
यावेळी आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात विनामोबदला 625 कोविड वॉरियर्स काम करतात, त्यांचा पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोना योद्धा म्हणून तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत, पोलीस उपअधीक्षक संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडेबोले-पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेड, पत्रकार अश्पाक मुल्ला, पोलीस नाईक धनराज शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.