
दैनिक स्थैर्य । 4 मे 2025। सातारा । माणसे मारणार्या दहशतवाद्यांना कोणतीही जात आणि धर्म नसतो. या निमित्ताने अनेक दुर्दैवी घटना पुढे येत आहेत. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जात आहे. वास्तविक दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ मुळासकट उद्ध्वस्त करायला हवेत अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे दिली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेला दहा दिवस उलटले असून, सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक दुर्दैवी बाबी पुढे येत आहेत.
गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. कायद्याने अल्पवयीन मुलांना शिक्षा देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या हाती बंदुका देऊन, दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ मुळातून उद्ध्वस्त केले पाहिजेत. वयाचा मुलाहिजा न बाळगता दहशतवाद्यांचा खात्मा केला, तरच अशा कारवायांना आळा बसेल.