स्थैर्य, मुंबई, दि. 23 : कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे. दहावी-बारावीची निकालही लांबलेत. निकाल कधी लागणार, ही परीक्षार्थींची चिंता आता दूर झालीय.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत दिली. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते, तर बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच संपली होती. दहावीचा भूगोल विषय वगळता इतर विषयांची परीक्षा झाली होती.
जिओ टीव्ही आणि गूगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत घेण्यात आलाय.
या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या सुद्धा उपस्थित होत्या. ऑनलाईन शिक्षण, दहावी-बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.