स्थैर्य, मुंबई, दि.३: कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनचे नियम यांचा मोठा फटका यंदाच्या शैक्षणिक वर्षाला बसला आहे. आता काही ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी हे वर्गही अद्याप बंद आहेत. या सर्व परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या यावर्षी होणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचे नियोजन राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने सुरू केले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत आज महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा ह्या १५ एप्रिलनंतर सुरू होतील. तर दहावीच्या परीक्षा ह्या १ मे नंतर घेण्याबाबत नियोजन अपेक्षित आहे, असे सांगितले.
दरम्यान, शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.