स्थैर्य, सातारा, दि.१०: खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यातील शुक्रवारी (ता.८) ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) उदघाटन केले. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींना फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पाे पोहचून निषेध नाेंदविला .या घटनेचा राजे समर्थकांनी वायसी कॉलेज ते पोवई नाका असा मूक मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली .
छत्रपती संभाजीराजे भोसले भुयारी मार्ग असा नावाचा लावलेला फलक शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे आज (शनिवार) काही नागरिकांच्या लक्षात आले. त्याची माहिती उदयनराजे समर्थकांना देखील मिळाली. या प्रकाराचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नाेंदविण्यास प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता उदयनराजे समर्थकांनी पाेवई नाका येथे जमण्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे शिवभक्त देखील मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले . यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे , अॅड दत्ता बनकर, सुनील काटकर, संग्राम बर्गे , किशोर शिंदे, बाळासाहेब ढेकणे तसेच शंभरहून अधिक कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले . पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब मांजरे हे घटनेचे गांभीर्य ओळखून हजर झाले . मांजरे यांनी राजे समर्थकांची समजूत घालून त्यांच्याशी चर्चा केली . राजधानी साताऱ्यात महापुरूषांच्या फलक फाडाफाडीचा घडलेला प्रकार निंदनीय आहे . या प्रकरणाचा तातडीने छडा लावून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अॅड दत्ता बनकर यांनी केली . नगराध्यक्ष माधवी कदम व सुनील काटकर यांनी या मागणीचा पुनरुच्चार करत फलक फाडणाऱ्या अपप्रवृत्तींचा निषेध केला . राजे समर्थकांनी वायसी कॉलेज ते पोवई नाका असा मूक मोर्चा काढून पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला .
दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधित फलक त्यांच्या ताब्यात घेतला. दरम्यान संबंधितांना शाेधून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी उदयनराजे समर्थकांनी पाेलिस विभागास केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञाताचा शोध घेण्याची शहर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे . स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
दरम्यान राजे समर्थकांनी काही तासातच कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गीकेवर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा नवीन फलक तयार करून तेथे पुन्हा दिमाखात झळकविला .
सीसीटीव्ही फुटेजमध्ये नैसर्गिकरित्या बॅनर फाटल्याचे स्पष्ट
श्री.छ.संभाजी महाराज यांच्या नावाचे बॅनर कोणीतरी अज्ञात समाजकंटकांनी फाडून खाली टाकल्याचा समज झाल्याने सातारा शहरातील नागरीकांच्या भावना दुखावल्या होत्या. अज्ञात समाजकंटकांचे विरुध्द गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत होती. त्याबाबत सातारा पोलीसांनी तपास करुन सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली असता हा बॅनर नैस र्गिकरित्या फाटून खाली पडल्याचे दिसून येत असून त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.