दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यातील पुसेगांव, ता. खटाव येथे श्री सेवागिरी महाराज वार्षिक यात्रा दि. 28 डिसेंबर 2021 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत भरणार आहे. या यात्रेचा मुख्य दिवस 1 जानेवारी 2022असून सदर दिवशी श्री. सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे रथातून मिरवणूक काढली जाते. सदर यात्रेकरिता महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून आठ ते नऊ लाख भाविक लोक येत असतात.
कोरोना या साथीच्या रोगाच्या अनुषंगाने श्री सेवागिरी महाराज रथोत्सव मिरवणुकीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला असून शासकीय नियमावलीनुसार कोविड-19 चे पालन करुन मंदिर तसेच शिवाजी चौक येथे नियोजित स्थिर ठिकाणी बॅरीकेटींगमध्ये रथ श्रींचे पादुका भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने भाविक मोठया प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच वाहनाचा अडथळा निमाण होवून वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता या पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (1) (ब) प्रमाणे अधिकारास अनुसरुन पुसेगाव गावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतूक दि. 28 डिसेंबर 2021 ते 7 जानेवारी 2022 पर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे.
प्रवेश बंद व नो पार्किंग – वडूज रोडवरील बंद राजवर्धन ढाब्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरिता राज्य परिवहन बसेसना वगळून सर्व वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आलेली आहे. सदर रोडवर दुतर्फा सर्व वाहनांना नो-पार्किंग झोन करण्यात आलेला आहे. वडूज रोडवरील सेवागिरी विद्यालयाकडे जाण्याकरिता सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
विसापूर फाट्याकडून शिवाजी चौकाकडे जाण्याकरिता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शिवराज मंगल कार्यालयाकडून शिवाजी चौकाकडे राज्य परिवहन बसेस वगळून येणारे सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच सदर रोडवर दुतर्फा सर्व वाहनांना नो-पार्किंग झोन करण्यात आलेला आहे.
फलटण रोडकडून प्रस्तावित एस.टी.स्टँङ पासून शिवाजी चौकाकडे जाणेकरिता राज्य परिवहन बसेस वगळून सर्व वाहनांना प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच सदर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा सर्व वाहनांना नो-पार्किंग झोन करण्यात आलेला आहे. शिवाजी चौक पुसेगाव येथून दहिवडी बाजुकडे, फलटण बाजूकडे, वडूज बाजुकडे (चौकापासून चारही बाजूस) व सेवागिरी मंदिरापासून दोन्ही बाजूस 200 मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आलेला आहे.
दि. 31 डिसेंबर 2021 रोजी 00.00 वा. पासून ते दि. 2 जानेवारी 2022 रोजी 24.00 पर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल करण्यात आलेला आहे. सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, राजापूर/कुळकजाईमार्गे दहिवडीकडे जातील व दहिवडी बाजूकडून येणारी वाहने कटगूण, खटाव, खातगूण, जाखणगाव मार्गे औंध फाट्याकडे विसापूर मार्गे साताराकडे जातील. वडूज बाजूकडून फलटण बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता खटाव, जाखणगाव, औंध फाटा, नेर ललगूण मार्गे फलटणला जातील. तसेच फलटण बाजूकडून वडूज बाजुकडे जाणारी वाहने नेर, ललगूण, औंध फाटा, जाखणगांव, खटाव मार्गे वडूजला जातील. दहिवडी ते डिस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी, राजापूर मार्गे जातील. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 अन्वये कारवाईस पात्र राहतील याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.