दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । खंडाळा । शिदेंवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत शिरवळ-भोर महामार्गावर एका वळणावर कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो चालकाचा ताबा सुटून खड्ड्यात पडला. या अपघातामध्ये जखमी झालेले टेम्पोचालक उमेश महादेव मदने (वय 38, रा. नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . अपघातानंतर माणूसकीचे तीन-तेरा वाजत नागरिकांनी टेम्पोमधील तब्बल 50 हजारांची कलिंगडे चोरुन नेली.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,नातेपुते जि.सोलापूर येथील राजवल्ली हिरालाल तांबोळी यांच्या मालकीचे टेम्पो क्रं.एमएच-45-9930 व टेम्पो क्रं.एमएच-12-केपी-4986 हे आहेत. यावर चालक म्हणून संतोष झेंडे व उमेश मदने हे कार्यरत आहे. दरम्यान, मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी दोन्ही टेम्पोमध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव याठिकाणी खाली करण्याकरीता केळी व कलिंगडे भरण्यात आली होती. यावेळी सदरील वाहने भोर-शिरवळ रस्त्यावरील शिदेंवाडी गावच्या हद्दीत एका मंगल कार्यालयासमोर असलेल्या वळणावर आले असता मध्यरात्री 11.45 वाजण्याच्या दरम्यान भरधाव वेगाने असलेल्या टेम्पो (क्रं.12-केपी-4986) वरील चालक उमेश मदने याला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पोचालक उमेश मदने याचे वाहनावरील नियंत्रण सुटत अचानकपणे महामार्ग सोडत महामार्गाशेजारी असणाऱ्या साधारणपणे वीस फुट असणा-या खड्ड्यात जाऊन आदळला. यावेळी पाठीमागे असलेल्या टेम्पो चालक संतोष झेंडे यांनी व उपस्थित नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत टेम्पोमधील गंभीर जखमी झालेल्या चालक उमेश मदने याला रुग्णवाहिकेमधून शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान चालक उमेश मदने याचा मृत्यू झाला. यावेळी उमेश मदने याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद संतोष झेंडे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन वीर हे करीत आहे.