स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : अश्विन पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या काकड आरती सोहळ्याची सांगता बुधवारी सायंकाळी दीपोत्सवाने करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये हजारो दिवे प्रज्वलित करून हा दीपोत्सव उत्साहात साजरा झाला.
सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात यानिमित्त विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या दीपोत्सवासाठी हजारो मेणपणत्या लावण्यात आल्या.
श्रीकृष्णाला आवडणारे मोरपीस, बासरी आणि विविध रंगांच्या भव्य रांगोळीने मंदिराचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.
सायंकाळी श्रीकृष्णाची महाआरती करण्यात आली. या दीपोत्सवासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
सातारा शहर परिसरातील पंचपाळी हौद येथील दुर्गामाता मंदिरातही हजारो दिवे लावून देवी भक्तांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. तसेच, शहरा नजीकच्या संगम माहुली परिसरात कृष्णा आणि वेण्णा नदीच्या काठावरही शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले.
राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिराच्या वतीने गुरुवारी, दि. ६ नोव्हेंबर रोजी देवीचा पालखी सोहळा साजरा होणार आहे. या पालखीने काकड आरती सोहळ्याची सांगता होईल, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व सचिव प्रशांत तुपे यांनी दिली.
या प्रमुख मंदिरांसोबतच सातारा शहरातील गोल मारुती मंदिर, राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिर आणि कृष्णा नगर परिसरातील श्री नटराज मंदिरातही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

