तहसीलदार, प्रांत कार्यालयासाठी लवकरच सुसज्ज इमारत; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री ना. पवारांचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा ही दोन्ही कार्यालये पोवई नाक्याजवळ एकाच परिसरात पूर्वापारपासून कार्यरत आहेत. त्याच आवारात महसूल विभागाशी संलग्न अन्य शासकीय कार्यालये, सेतू कार्यालय असून याठिकाणी जागेच्या कमतरतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयासह इतर सर्वच कार्यालयांसाठी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारावी, अशी आग्रही मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी तातडीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.   
 
सातारा येथील उप विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय सातारा हे पोवई नाका जवळील १.१० हे.आर. इतक्या कमी जागेत आहे. याच ठिकाणी अधिक्षक भूमी अभिलेख साताराउपअधिक्षक भूमि अभिलेख सातारादुय्यम निबंधक सातारानगर भूमापन अधिकारी सातारामुद्रांक जिल्हाधिकारी सातारा, सेतु कार्यालय ही सर्व कार्यालये आहेत. त्यातच याच ठिकाणी ३१ स्टॅप व्हेंडर/ पिटीशन रायटर व कॅन्टीन आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या कामानिमित्त या परिसरारच्या आवारात दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या खुप मोठी असून उपलब्ध जागा अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरेशी करता येत नाही आणि छोटी कार्यालये पाहता याठिकाणी नागरिकांसह शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असते.
नागरिकांची गैरसोय टाळून त्याठिकाणच्या सर्वच कार्यालयांतील कामकाजामध्ये सुसूत्रता आणि सुलभता येऊन त्याचा फायदा नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावा यासाठी प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा यासह सदर जागेतील सर्व कार्यालयांसाठी एक सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्याकडे केली. ना. पवार यांनी यासांदर्भात तातडीने निर्णय घेऊन या सर्व कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा निर्णय घेतला असून इमारत उभारणीसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह याना दिल्या. यामुळे प्रांताधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय सातारा आणि त्या जागेतील इतर सर्वच कार्यालयांसाठीच्या नवीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Back to top button
Don`t copy text!