तहसिलदार सतिश कदम यांनी मिळविली अर्थशास्त्र विषयात “पीएच.डी.”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । रायगड । रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्वसन शाखेचे तहसिलदार श्री.सतिश पांडुरंग कदम यांनी नुकतीच श्री शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून अर्थशास्त्र या विषयातील पीएच.डी. प्राप्त केली आहे. यासाठी अर्थशास्त्र विषयातील संशोधनात्मक कार्याचे गाढे अभ्यासक धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारा येथील बँक व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विजय कुंभार यांनी श्री.कदम यांना “गाईड” म्हणून मार्गदर्शन केले आहे.

त्याचबरोबर श्री शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.ज्ञानदेव तळुले, प्रा.डॉ.महादेव देशमुख, प्रा.डॉ.पी.एस.कांबळे यांचेही श्री.कदम यांना मोलाचे सहकार्य लाभले आहे.

श्री.कदम हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील रहिवासी आहेत. आई मीनाक्षी आणि स्वर्गवासी वडील श्री.पांडुरंग कदम यांची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान या निमित्ताने श्री.कदम यांनी व्यक्त केले असून प्रशासनाची व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पीएच.डी.चे कामकाज करीत असताना पत्नी सौ.निर्मला कदम यांनीही त्यांना मोलाची साथ दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.सतिश कदम यांचे प्राथमिक शिक्षण कराड नगरपरिषद शाळा क्र. 8 येथे तर माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल, कराड येथे झाले. त्यानंतर वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथून अर्थशास्त्र विषयातील पदवी (B.A.) संपादन करून नंतर त्यांनी 2001 साली सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथून अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (M.A.) संपादन केली. या परीक्षेत त्यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता आणि आता तब्बल 21 वर्षांनी त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. शासकीय सेवेतील व व्यक्तिगत आयुष्यातील शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शासकीय सेवा भावना जपत, कर्तव्यभावना जपत तहसिलदार सतिश कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आईवडिलांची इच्छा पूर्ण केली, याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्री.सतिश कदम हे शासकीय सेवेत नोव्हेंबर 2002 मध्ये नायब तहसिलदार म्हणून रुजू झाले असून ऑक्टोबर 2018 पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे तहसिलदार (पुनर्वसन) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई (शहर) या ठिकाणी शासकीय सेवा बजावली आहे. श्री.कदम हे सावंतवाडी येथे तहसिलदार म्हणून कार्यरत असताना सन 2016-17 या महसुली वर्षात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल 1 ऑगस्ट 2017 या महसूल दिनी त्यांचा तत्कालीन सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता.


Back to top button
Don`t copy text!