स्थैर्य, नागपूर, दि.१९: स्वदेशीचा आधार घेऊन
तंत्रज्ञानाचा विकास करीत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या भागाचा
विकास करून देश स्वावलंबी होऊ शकतो. तसेच विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित
करून ते गावांमध्ये पोहोचावे आणि गावांचा विकास व्हावा. यातूनच आयातीला
पर्याय निर्माण होईल व देश स्वावलंबी होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
स्वदेशी जागरण मंचातर्फे काही उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते
बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. रा.
स्व. संघाचे प्रचारक डॉ. मनमोहन वैद्य हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
होते.
आपला उद्योग-व्यवसाय हा एक परिवार आहे, अशी संकल्पना स्व. दत्तोपंत ठेंगडी
यांनी रुजवली होती, असे सांगताना गडकरी म्हणाले, व्यवसायातून पैसा कमावला
पाहिजे पण सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आमच्यावर जे संस्कार झाले
ते दत्तोपंतांमुळे झाले. सामाजिक समानता, सामाजिक समरसता, स्वदेशी, कामगार
संघटन, अर्थव्यवस्था या क्षेत्रात खूप मोठे कार्य त्यांनी केले . आर्थिक,
सामाजिक मागासलेपणा दूर करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. समाजात समता
प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दिलेले सामाजिक ०चतन, समन्वयाचा विचार आणि
देशाची आर्थिक व्यवस्था कशी मजबूत होईल, अशी त्यांची धारणा होती, असेही ते
म्हणाले.
आयातीला पर्याय निर्माण होऊन निर्यातीला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे
सांगताना नितीन गडकरी म्हणाले ७ लाख कोटींच्या इंधनाची आयात कमी कशी करता
येईल, यासाठी पर्याय समोर येणे आवश्यक आहे. जैविक इंधनाची निर्मिती आणि
त्याचा वापर हाच त्यावर स्वदेशी आणि स्वावलंबनाकडे नेणारा पर्याय आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत आपण टिकावे, आपले उत्पादन वाढावे,
उत्पादन खर्च कमी व्हावा, उत्पादनाचा दर्जा उत्तम असावा, किंमत कमी असावी,
वाहतूक खर्चात बचत व्हावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, यामुळे आपण
निर्यात वाढवू शकू व आर्थिक युध्दात टिकून राहू शकू असे सांगून गडकरी
म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेक उद्योजकांनी आपला परिवार समजून उद्योग
टिकवून ठेवले. उद्योगात काम करणा-यांची काळजी घेतली. या काळात सकारात्मकता
आणि आत्मविश्वास टिकवून ठेवणे आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.