दैनिक स्थैर्य । दि. 01 जुलै 2021 । फलटण । रोहित वाकडे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या भाषणाचे वैशिष्ठ्य म्हणजे; 130 करोड जनतेला उद्देशून केलेली ही ‘मन की बात’ आपल्या फलटण तालुक्यातील सरडे गावातील एका माऊलीला आनंदाश्रू देवून गेली. आपल्या लेकाचे कौतुक पंतप्रधानांच्या तोंडून ऐकताना ही माय पूरती गहिवरली. तर दुसरीकडे गावच्या सुपूत्राचा हा बहुमान ऐकून सरडेकरांसह संपूर्ण जिल्ह्याची छाती अभिमानाने भरुन आली आणि त्यामुळेच ‘‘प्रविण गड्या, तू देशासाठी पदक जिंकून आणच !‘‘, अशी भावना जिल्हावासियांच्या तोंडून व्यक्त होताना दिसू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात दि.23 जुलै पासून जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहरात सुरु होणार्या ऑलंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना त्यांनी काही ठराविक खेळाडूंचा आवर्जून उल्लेख केला, त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील प्रवीण रमेश जाधव या 24 वर्षीय युवकाचाही समावेश होता. पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘मित्रांनो, जेव्हा बुद्धिमत्ता, समर्पण, निश्चय आणि खिलाडू वृत्ती एकत्र येतात, त्यावेळी चॅम्पियन घडत असतात. आपल्या देशातील बहुतांश क्रीडापटू लहान गाव किंवा छोट्या शहरांमधून येतात. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्या आपल्या पथकामध्ये देखील अश्या अनेक प्रेरणादायी खेळाडूंचा समावेश आहे. फलण तालुक्यातील प्रवीण जाधव यांच्याबद्दल ऐकल्यावर तुम्हाला देखील तसेच वाटेल. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवीणने किती तरी अडी-अडचणींचा सामना केला आहे. प्रवीण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील आहे. तो धनुर्विद्येत फार चांगली कामगिरी करतोय. त्याचे आई वडील उपजीविकेसाठी रोजंदारीवर काम करीत आहेत, आणि त्यांचा मुलगा आपल्या पहिल्या वाहिल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी टोकियो येथे जात आहे. ही केवळ त्याच्या पालकांकरिताच नव्हे, तर आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.’’
पंतप्रधानांचे हे कौतुकाचे शब्द प्रविणच्या आईने जेव्हा ऐकले तेव्हा त्यांना अक्षरश: आनंदाश्रू अनावर झाले. ‘‘आम्ही त्याला फक्त जन्म द्यायचे काम केले. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला कुठलीच मदत आम्हाला करता आली नाही. त्याचे शिक्षक विकास भुजबळ व अन्य मार्गदर्शकांच्यामुळे आज तो खेळू शकत आहे. त्याने असेच आणखी खेळत रहावे. ऑलंपिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकून आणावे’’, अशा शब्दात आपल्या भावना प्रविणच्या आई सौ.संगिता जाधव व वडील रमेश जाधव यांनी पंतप्रधानांच्या भाषणानंतर व्यक्त केल्या.
‘‘सरडे गावचा स्वाभिमान आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता प्रविण जाधव याची ऑलंपिकसाठी झालेली निवड आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रविणचे केलेले कौतुक आम्हा सरडे ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद असून प्रविण ऑलंपिकस्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून आपल्या भारताचा तिरंगा जपानमध्ये नक्कीच उंचावेल’’, अशी प्रतिक्रिया सरडे ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच दत्ता भोसले यांनी दिली.
अशी आहे प्रविणची खडतर यशकथा….
प्रविणला लहानपणीपासूनच खेळाची अतिशय आवड होती. जिल्हास्तरीय 800 मीटर धावण्याच्या स्पर्ध्येमध्ये त्याने भाग घेतला, पण शारीरिक क्षमता कमी असल्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विकास भुजबळ यांनी त्याच्या प्रशिक्षणाची आणि आहाराची आर्थिक जबाबदारी स्विकारली. त्याचा परिणाम म्हणून त्याची कामगिरी उंचावली आणि क्रीडा प्रबोधिनी शाळेत तो दाखल झाला. पुण्यातील बालेवाडी येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर तो तिरंदाजीच्या प्रशिक्षणासाठी अमरावतीला गेला. तेथे देखील शारीरिक निकषांवर त्याची कमी पडणारी ताकद यामुळे त्याची कामगिरी समाधानकारक होत नव्हती. विकास भुजबळ यांनी शिक्षण अधिकारी महेश पालकर यांना प्रविणला शेवटची संधी देण्याची विनंती केली. 5 शॉटची संधी मिळालेल्या प्रवीण याने 45 गुणांची कमाई करत आपले प्रशिक्षण संस्थेमधील स्थान टिकविले.
2016 मध्ये थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या आशियाई चषक स्टेज 1 स्पर्धेमध्ये त्याने भारताचे प्रथम प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या सांघिक संघातून त्याने रिकर्व्ह गटात कांस्य पदक मिळविले. त्याच वर्षी त्याने कोलंबिया देशातील मेदेयीन शहरात झालेल्या जागतिक तिरंदाजी चषक स्पर्धेमध्ये भारतीय ब संघाचे प्रतिनिधित्व केले.
याच दरम्यान भारतीय तिरंदाजांच्या कंपाऊंड टिमचे प्रशिक्षक कर्नल विक्रम धायल यांचे लक्ष वेधल्यानंतर सन 2017 मध्ये प्रविण स्पोर्ट कोट्यातून भारतीय सैन्यदलात रुजू झाला.
2019 मध्ये नेदलरँडमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये रिकर्व्ह प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळवणार्या भारतीय संघामध्ये अतनू दास, तरुणदीप राय यांच्या बरोबरीने प्रवीण जाधवने भारतासाठी या तब्बल 14 वर्षांनंतर रौप्य पदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आणि आता टोकियो ऑलंपिकमध्ये देशासाठी पदकाचा अचूक वेध घेण्यासाठी तिरंदाज प्रविण जाधव आपल्या सहकारी खेळाडूंसमवेत सज्ज झाला आहे.