
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (79) जोरावर 9 बाद 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 205 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 30 धावांत 3 विकेट गमावल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर (79), अक्षर पटेल (42) आणि हार्दिक पंड्या (45) यांनी संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडने त्यांचे दोन्ही सलामीवीर 49 धावांत गमावले. त्यानंतर केन विल्यमसन (81) ने झुंज दिली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडचा संघ 45.3 षटकांत 205 धावांवरच गारद झाला. भारताकडून वरुणने शानदार कामगिरी केली आणि 10 षटकांत 42 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुणचा हा पहिलाच सामना होता आणि तो चमक दाखवण्यात यशस्वी झाला.
एकेवेळ न्यूझीलंडचा संघ चांगल्या स्थितीत होता. पण वरुणच्या फिरकीच्या जाळ्यात त्यांचे एक-एक फलंदाज अडकत गेले. त्याने केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर विजयी निकाल भारताच्या बाजूने लागला. वरुण व्यतिरिक्त कुलदीप यादवने दोन, तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारताने या सामन्यात चार फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज खेळवले. न्यूझीलंडच्या सर्व नऊ विकेट फिरकीपटूंनी घेतल्यामुळे भारताला चार फिरकीपटूंना मैदानात उतरवण्याचा फायदा झाला. भारताकडून मोहम्मद शमी हा एकमेव गोलंदाज ज्याचे विकेट्सचे खाते रिकामे राहिले. तथापि, त्याने या सामन्यात फक्त चार षटके टाकली.