स्थैर्य ,अहमदाबाद, दि. ०३: उद्यापासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील चाैथ्या कसोटी सामन्याला सुरुवात हाेणार आहे. ही कसोटी अहमदाबादच्या मैदानावर आयाेजित करण्यात आली. याच कसोटीच्या तयारीसाठी यजमान भारतीय संघाचे खेळाडू कसून मेहनत घेत आहेत. यासाठी नेटवर कसून सराव करण्यात येत आहे. तिसऱ्या कसोटीतील विजयाने टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेशाचा दावा मजबूत झाला आहे. आता चौथ्या कसोटीतही विजयी पताका फडकवून ही फायनल गाठण्यावर टीम इंडियाची नजर आहे. सध्या इंग्लंड संघाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे. आता चौथ्या कसोटीतील विजयानेच टीम इंडियाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता येणार आहे. याशिवाय कसोटी ड्राॅ झाल्यासही भारतीय संघाला फायदा हाेणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र माेदी स्टेडियमवर पाहुण्या इंग्लंड संघाचे अनुभवी फलंदाज सपशेल अपयशी ठरले. यातूनच इंग्लंड संघाने आता आपल्या संघासाठी मार्कस ट्रेस्काेथिक यांची फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता मार्कस यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडची आघाडी आणि मधली फळी आपल्या फलंदाजीचा दर्जा उंचावणार आहे. कारण, या मालिकेतील दाेन्ही कसाेटी सामन्यात इंंग्लंड संघाला सुमार फलंदाजीचा माेठा फटका बसला. तिसऱ्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात टीमने ८१ धावांत आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे संघावर प्रचंड टीकाही झाली. मात्र, या दरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंनी सर्व काही खापर खेळपट्टीवर फाेडले.