इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणे ही अत्यंत गंभीर चूक

प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली खंत


स्थैर्य, सातारा, दि. 24 सप्टेंबर : आधुनिक काळामध्ये इंग्रजी माध्यमाचा प्रसार आणि प्रचार वाढत चालला आहे. मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे ही मुले आपल्या भोवतालापासून तुटतात आणि भविष्यात त्यांच्या मानसिकतेवर त्याचा गंभीर परिणाम होतो अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणे ही अत्यंत गंभीर चूक आहे. कोणत्याही संकल्पना मातृभाषेतून जास्त चांगल्या प्रकारे समजावून सांगितल्या जाऊ शकतात. इंग्रजी किंवा इतर भाषेचा वापर करत असताना आपण दुसर्‍याची गैरसोय लक्षात घेतो.आपण इतरांना मराठी बोलण्यासाठी प्रवृत्त करत नाही, अशी खंत प्रा. रंगनाथ पठारे यांनी केली.

येथील आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या तिसर्‍या वाचू आनंदे वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री उपस्थित होते.

प्रा रंगनाथ पठारे म्हणाले, भाषा हा आता आपल्या आस्थेचा विषय राहिलाच नाही अशी खंत व्यक्त करून प्राध्यापक पठारे म्हणाले, लेखकाने वाचकाकडे प्रथम लक्ष द्यायला पाहिजे. कारण वाचकच लेखकाचा दर्जा ठरवतो. तरुण वाचकांची संख्या कमी आहे याचीही दखल घेण्याची गरज आहे. या छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून वाचकांची संख्या वाढू शकते.
मराठी साहित्यामध्ये दरबारी लेखकांची संख्या जास्त आहे लेखकाचा कणा ताठ असायला हवा.लेखकाने नीतीधैर्य पाळायला हवे. नैतिक धाक असलेले लेखक सध्या कमी आहेत.नैतिक धरणांना धक्के देण्याचे काम साहित्य करते. चांगला लेखक असा धक्का देण्याची जोखीम घेतो असेही यावेळी पठारे यांनी सांगितले

अध्यक्षस्थानावरून बोलताना मिलिंद जोशी यांनी वाचकांच्या मनात सर्वोच्च स्थान मिळालेल्या लेखकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे अशीच साहित्य महामंडळाची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. वाचन हा समृद्ध करणारा प्रवास असून छोटे वाचक समूहच साहित्याला समृद्ध करतात असे सांगून प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले, वाचकांनी सुद्धा आपले वाचन एकांगी ठेवायला नको. सर्व प्रकारचे साहित्य वाचायला हवे. त्यानंतर चांगले काय आणि वाईट काय याची निवड वाचक करू शकतो. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे यांच्यासारखे साहित्यिक जोपर्यंत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा पाठपुरावा चालूच ठेवू आमच्यामध्ये तेवढी सहनशीलता आहे असेही यावेळी मिलिंद जोशी यांनी स्पष्ट केले

विनोद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यामध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.आम्ही लेखकाची जात न बघता लेखकाची प्रतिभा बघणारे लोक आहोत असेही त्यावेळी यांनी स्पष्ट केले. संदीप श्रोत्री यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आम्ही पुस्तक प्रेमी समूहाची माहिती दिली आणि सातारा येथे होणार्‍या साहित्य संमेलना कडून काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट केले

संमेलन स्थळी पुस्तकप्रेमी समूहाच्या सदस्यांनीच लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रंगनाथ पठारे यांचा सत्कार विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते तर प्राध्यापक मिलिंद जोशी यांचा सत्कार डॉ संदीप श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आला शिरिष चिटणीस यांनी रंगनाथ पठारे यांच्या मानपत्राचे वाचन केले. यावेळी आवर्जून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ लेखिका, प्रकाशिका सुमती लांडे यांचाही आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले. विशाल देशपांडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!