मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक झोकून देवून काम करतात : श्रीमंत संजीवराजे; फलटण येथे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । फलटण । कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना प्रा. शिक्षकांनी शाळेत येवून ऑनलाईन टेक्नॉलॉजी द्वारे तर प्रसंगी काही मुलांना घरी जावून शिक्षण दिले, स्पर्धेत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शिक्षक झोकून देवून काम करीत होते. शिक्षकांना मार्गदर्शन करावे असे आपणाला कधी वाटले नाही तथापी शहरी व ग्रामीण शिक्षणात आजही मोठी तफावत असल्याने उच्च शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची कुचंबना टाळण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करुन शिक्षकांनी सदर तफावत दूर करावी असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण यांचेवतीने सन २०१९ – २०२०, सन २०२० – २०२१ आणि सन २०२१ – २०२२ या ३ वर्षातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती सौ. रेखा खरात, सदस्य सचिन रणवरे, संजय कापसे, संजय सोडमिसे, सौ. प्रतिभा धुमाळ, श्रीराम कारखाना संचालक महादेव माने, पोलीस पाटील संघटनेचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे, तालुकाध्यक्ष अजितराव बोबडे, गटविकास अधिकारी सौ. अमिता गावडे – पवार, प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांच्यासह पंचायत समिती व शिक्षण विभागाचे अधिकारी, पुरस्कार प्राप्त शिक्षक / शिक्षिका उपस्थित होत्या.

शैक्षणिक क्षेत्रात काम करताना शिक्षक भावी पिढी घडविण्याचे काम करीत असल्याचे गौरवपूर्ण शब्दात नमूद करीत फलटण तालुक्यात ३०० शाळा व ९०० शिक्षक कार्यरत आहेत. या समारंभाच्या माध्यमातून या सर्वांचा प्रातिनिधिक सत्कार होत असल्याचे नमूद करीत कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ ३ वर्षे घेता आला नाही, शासकीय परवानगी घेवून आजचा समारंभ आयोजित केला असल्याने प्रा. शिक्षकांच्यात समाधानाचे वातावरण असल्याचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांनी सांगितले.

प्रारंभी प्रभारी गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पाटणे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त करणारे पत्राचे वाचन केले. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व शिक्षिका यांनी मनोगते व्यक्त केली.

गेल्या ३ वर्षातील सातारा जिल्हास्तरीय व फलटण तालुकास्तरीय १०० आदर्श प्रा. शिक्षकांना पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. हा समारंभ फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरु होता.


Back to top button
Don`t copy text!