शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाद्वारे आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । शिक्षण हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून राज्याच्या शिक्षण विभागाचे काम पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने सुरू आहे. शिक्षण संस्थाचालक आणि शिक्षकांनी देखील दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची आदर्श पिढी घडविण्याचे काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर निकषांची पूर्तता करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते इरादा पत्रे तथा मान्यता पत्रे देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संस्थाचालकांकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली. मंत्रालयातील परिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियान संचालक कैलास पगारे, स्वयंअर्थसहाय्यित शाळाचालक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याने देशाला अनेक नामवंत विद्वान, विचारवंत, शास्त्रज्ञ, शिक्षक दिले आहेत. भविष्यातील पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांचे स्थान आदराचे असून या कामी शिक्षण संस्थांचेही महत्त्वपूर्ण योगदान असते. शिक्षण हा वसा मानून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सर्वांनी काम करावे, शासन म्हणून आम्ही ठामपणे पाठिशी आहोत, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात शिक्षणाचा विस्तार झाला आहे. तथापि, गुणवत्तावाढ होणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्ता पोहोचली पाहिजे. यासाठी शिक्षण क्षेत्र हा व्यवसाय नाही तर मिशन आहे असे समजून संस्थाचालकांनी आणि शिक्षकांनी काम करावे. याद्वारे नवीन पिढी घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करायचे असून त्यातून चांगली समाजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न कराल, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी इरादापत्रे डिजिटली दिली जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील पद्धती पारदर्शी करण्याचा प्रयत्न होत आहे, याबद्दल त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि विभागाचे अभिनंदन केले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात शिक्षण हे पवित्र क्षेत्र असल्याचा उल्लेख करून विभागाचे कार्य पारदर्शक आणि गतिमान करणार असल्याचे सांगितले. ज्या संस्था पात्र आहेत त्यांना मान्यता मिळणार आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचा भर आहे. त्याचबरोबर उद्याची पिढी गुणवान घडवायची असल्याने संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, असे सांगून महाराष्ट्र विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रस्थानी राहण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!