शिक्षकांनी आपापल्या विषयातील नवीन प्रवाह समजून घ्याव्यात – श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
शिक्षकांनी आपल्या विषयातील नवीन प्रवाह समजून घेऊन स्वतः अद्यावत राहिल्यास त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होऊ शकेल, त्यासाठी अशाप्रकारच्या चर्चासत्रांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय फलटण व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त सहभागाने ‘गणित व संगणक शास्त्रातील बदलते प्रवाह’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या चर्चासत्रासाठी बीजभाषक म्हणून संभाजीराव कदम महाविद्यालय देऊरचे प्राचार्य डॉ. बी. एन. भोसले यांनी गणितातील मूलभूत संकल्पना, बदलत्या संदर्भात कशा वापरल्या जातात याचे दृकश्राव्य सादरीकरण केले.
तेलंगणा विद्यापीठ हैदराबाद येथील डॉ. भालेराव यांनी दुसर्‍या सत्रामध्ये ‘गणितामधील बदलते प्रवाह’ सादर केले. तिसर्‍या सत्रामध्ये डॉ. खोब्रागडे मॅडम यांनी संगणक शास्त्रातील बदलत्या प्रवाहावर सादरीकरण केले आणि चौथ्या सत्रामध्ये सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांनी आपले संशोधन लेख सादर केले.

चर्चासत्राच्या प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात महाविद्यालयातील विविध गुणवत्ता प्रकल्पांचा आढावा घेऊन चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला.

समन्वयक डॉ. कवठेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य निवृत्त प्रा. रत्नपारखे हे चर्चासत्र समारोपाचे पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शेवटी अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणचे प्रा. डी. एन. शिंदे यांनी समारोप व आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!