दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । सातारा । शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना कविता कशी सादर करावी,चाल कशी लावावी ,आशय कसा पोचवावा,भाव अभिनयाद्वारे कविता कशी पोचवावी यासाठी जाणीवेने शाळेत निवडक कविता विद्यार्थ्याकडून कौशल्ये देऊन बसवून घेतल्या पाहिजेत. कवितेचे सादरीकरण केवळ शाळा विद्यालय,महाविद्यालयात न करता वेगवेगळ्या घराघरात नेले पाहिजे. ग्रामीण परिसर असो किंवा शहरात अपार्टमेंटमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी कविता प्रत्येक घरात सादर केली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांची एक कलात्मक चळवळ निर्माण होईल.मुले धीट होतील.मुलांची मने उदात्त होतील. त्याला नाट्यकला आत्मसात होईल. रसिकांच्या प्रतिक्रिया तत्काळ मिळतील. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांद्वारे कविता घराघरात नेली पाहिजे असे मत सातारा येथील प्रसिद्ध रंगकर्मी,कवी चंद्रकांत कांबिरे यांनी व्यक्त केले.ते ‘कलेचा जीवनात उपयोग’ विषयावर विद्यार्थ्याशी बोलत होते .छत्रपती शिवाजी कॉलेज येथील मराठी विभागाचे प्रमुख, व ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव ‘या कवितासंग्रह लिहिणारे कवी ’प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे ही यावेळी उपस्थित होते. कलेचे महत्व सांगताना चंद्रकांत कांबिरे पुढे म्हणाले की,’आपल्या परिसरातील कला कोणत्या हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे. परिसराची जाण आणि भान आपल्याला असावे.कला ही तुमचे जीवन व भावविश्व समृद्ध करते. कला जीवनाला आकार देत असते.कला मन सन्मान,पद ,प्रतिष्ठा आणि पैसा देखील देत असते. लता मंगेशकर यांनी कलेच्या आधाराने आपले कुटुंब तर जागवले पण जागतिक कलावंत म्हणून अत्युच्च स्थान मिळवले. कला महान कलावंतांची चरित्रे आपण आवर्जून वाचली पाहिजे. कलावंत हा भावनाशील असतो.आई ही एक कलावंत असते .ती
आपल्या मुलाला कलावंत घडवितो. म्हणून आईच्या भावना नीट समजून घेणारा माणूस हाच चांगला कलावंत होऊ शकतो. यासाठी आपली वाणी चांगली तयार केली पाहिजे. आवाज संवर्धन करण्यासाठी रोज मोठ्या आवाजात पाच वेळा बाराखडी म्हणा. कविता मूल्य घेऊन येत असते .अभ्यासाचे श्रम घेतल्याशिवाय आपले व्यक्तिमत्व चांगले होणार नाही. कवितेमुळे आपल्याला लय कळते.आईच्या भावनेने जगले पाहिजे .आपल्या परिसरातल्या कोंबड्या ,कुत्री ,करडे ,शेरडे ,यावर प्रेम केले पाहिजे.दावण समृद्ध असली पाहिजे .जाती पातीच्या पलीकडे प्रेम करावे. आईच्या मायेने ज्याला बोलता येत नाही तो कलावंत होऊ शकत नाही. यातूनच कलावंत अभिनेता घडत असतो. निर्व्यसनी रहा ,खरे बोला,नीटनेटके असावे.इतरांना मदत केली पाहिजे.त्यांनी एक त्यांची ‘माय आणि माती’ कविता सादर केली. ‘’माय म्हणायची,काय सांगते नीट ऐक लेका,बाजरी पेरून उगवत नसतो मका,पेरलं नीतीनं तर उगवेल गतीनं,मतीच्या भूमिकेला माय काळी देत नाही धोका ,इंद्रायणीच्या डोहात उतरल्या शिवाय कळत नाही तुका ..ही अतिशय आशय संपन्न कविता सादर केली. ते म्हणाले की निसर्गाचे वाचन केले पाहिजे .इतरासाठी जगण्याची प्रेरणा निसर्ग देत असतो. श्रमाशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. नाट्यशास्त्र अभ्यासले पाहिजे. कला या सादरीकरणाच्या आहेत. त्यामुळे सादरीकरणाने त्या मनात उभ्या राहतात .म्हणून कोणत्याही गोष्टीचा खोलात
जाऊन अभ्यास केला पाहिजे असे म्हणाले. त्यांनी फ.मु.शिंदे यांची आई, बैल,जय जय शिवराया, संत तुकाराम यांचे अभंग, बैल इत्यादी कविता सादर केल्या.सयाजी शिंदे ,निळू फुले दिवाकरांच्या नाट्यछटा, लोक कला ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेकविध संदर्भ त्यांनी मुलांना सांगितले. इंग्रजी शाळात होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी उमाकांत काणेकर यांची‘ प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा’ हे गीत सादर केले.विद्यार्थ्यांनी स्वतः सामुहिक गायन केले. डॉ.वाघमारे यांनी दर शनिवारी विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढेल असे कार्यक्रम विद्यालयात घ्यावेत असे आवाहन केले .अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना कला कौशल्य मनापासून आत्मसात करावीत असे आवाहन करून चंद्रकांत कान्बिरे यांचे आभार व्यक्त केले . प्रास्ताविक श्री .सुधाकर शिंदे यांनी केले .यावेळी शाळेतल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी काव्यास्वाद घेतला. काळ्याभोर ढगांच्या सानिद्ध्यात अधून मधून रिमझिम अंगावर घेत विद्यार्थ्यांनी गायनात सहभागी होऊन टाळ्याचा ताल देत आनंद घेतला.